आयुष्यभर सांभाळण्याची ग्वाही घेऊन पत्नीला केले पतीच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 02:10 PM2020-02-13T14:10:51+5:302020-02-13T14:12:09+5:30
मोहोळ पोलीस ठाण्यात समुपदेशन; आहेर करून पोलीसांनी केला जोडीदारांचा सन्मान
लांबोटी : आयुष्यभर सांभाळण्याची ग्वाही घेऊन पत्नीला पतीच्या स्वाधीन केले़ मोहोळ पोलिसांनी दोघांचा संसार सुरळीत करण्यासाठी समुपदेशन करून सामाजिक काम केले आहे. १५ दिवसातील ही दुसरी घटना आहे. यावेळी प्रियंका चंदनशिवे व रोहित गायकवाड यांचा आहेर करून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी त्यांचा सन्मान केला.
प्रियंका चंदनशिवे व रोहित गायकवाड हे दोघेही लांबोटी (ता. मोहोळ ) येथील एकमेकाशेजारचे रहिवासी आहेत. शेजारच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनंतर रोहितने प्रियंकाला विवाह करण्याचे आश्वासन दिले.
काही दिवस गेल्यानंतर प्रियंकाने रोहितच्या मागे कधी विवाह करायचा, असा लकडा लावला. मात्र रोहितने अचानक विवाहास नकार दिला़ दुसरीकडे प्रियंकाच्या चुलता-चुलतीनेही या विवाहास नकार दिल्यामुळे प्रियंका ही मनाने खचली. दोन महिने वाट पाहिल्यानंतर प्रियंकाने मोहोळ पोलीस ठाण्यात रोहितच्या विरोधात तक्रारी अर्ज दिला. अर्जाची चौकशी सुरू झाली़ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस कॉन्स्टेबल अनुसया बंडगर यांनी दोघांनाही बोलावून त्यांचे समुपदेशन केले.
समुपदेशनानंतर रोहित प्रियंकाला स्वीकारण्यास तयार झाला. त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोहोळ येथील चंद्र्रमौळी गणेश मंदिरात ३० रोजी मोजक्या नातेवाईकांसमक्ष एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून विवाह केला. या नवोदित पती-पत्नीस नवीन कपड्यांचा आहेर घेऊन त्यांचा पोलिसांनी सन्मान केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या यशोदा कांबळे, बी. जी. चंदनशिवे, भाऊ चंदनशिवे यांच्यासह मुला-मुलीकडील नातेवाईक उपस्थित होते. प्रियंकाची आई लहानपणी दिवंगत झाली आहे तर वडील वृद्ध आहेत़ भावाने तिचा सांभाळ केला आहे.