बेशुद्ध पतीला पाहायला निघालेल्या पत्नीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:54+5:302021-06-25T04:16:54+5:30
कुर्डूवाडी : अर्धांगवायूचा झटका आल्याने बेशुद्धावस्थेत दवाखान्यात उपचार घेणाऱ्या पतीस पाहण्यासाठी निघालेल्या पत्नीने लऊळ गावच्या रस्त्यावरील विहिरीत उडी घेऊन ...
कुर्डूवाडी : अर्धांगवायूचा झटका आल्याने बेशुद्धावस्थेत दवाखान्यात उपचार घेणाऱ्या पतीस पाहण्यासाठी निघालेल्या पत्नीने लऊळ गावच्या रस्त्यावरील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. रुक्मिणी नवनाथ देवकर (वय ४५, रा. लऊळ, ता. माढा) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेचा पती नवनाथ देवकर याला आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी अर्धांगवायूचा दुसरा झटका आल्याने बेशुद्ध अवस्थेतच त्याला कुर्डूवाडीतील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. ते तिथे बेशुद्धावस्थेतच उपचार घेत होते. त्यामुळे सदर महिला गुरुवारी सकाळी ९ च्या दरम्यान घरातून दवाखान्यात जाते म्हणून मुलांना सांगून निघाली. दरम्यान, रस्त्यातच तिने एका विहिरीच्या कठड्यावर चप्पल ठेवून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
यानंतर काही वेळाने घटनेची माहिती कुर्डूवाडी पोलिसांना मिळताच घटनास्थळावर फौजदार हनुमंत वाघमारे यांनी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा करून महिलेला विहिरीतून बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर तिच्यावर गाडेवस्तीवरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
----
पती दवाखान्यात बेशुद्ध अन् पत्नी देवाघरी
पती दवाखान्यात बेशुद्ध असतानाच पत्नीने आत्महत्या केल्याने ती देवाघरी गेली. आयुष्यभर एकमेकांना साथ दिलेल्या आपल्या साथीदाराच्या अंत्यविधीलाही बेशुद्ध असलेल्या पतीला जाता आले नाही. या दुर्दैवी घटनेने देवकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. सर्वांनी एकच हंबरडा फोडला. दोन मुलांवर वडील दवाखान्यात बेशुद्ध आणि त्याचवेळी घरी आईचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी अशी घटना घडल्याने लऊळ गावावरही शोककळा पसरल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
----