पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला जन्मठेप
By admin | Published: May 3, 2014 01:23 PM2014-05-03T13:23:37+5:302014-05-03T14:41:51+5:30
घरातून निघून जा म्हणून त्रास देणार्या पतीचा पलंगाला बांधून लाकडाने मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सोलापूर : घरातून निघून जा म्हणून त्रास देणार्या पतीचा पलंगाला बांधून लाकडाने मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून शहेनाज अमजद शेख (वय 40, रा. मड्डीवस्ती, कुमठे, उत्तर सोलापूर) हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्पना होरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
आरोपी शहेनाज हिचा पती अमजद (वय 45) हा कारखान्यात काम करीत होता पण घरखर्चाला घरी पैसे देत नसे. त्याला तीन मुले आहेत. त्यातील एक मुलगा भिवंडीत कामाला गेला होता तर दोन मुले सोबत राहत होती. कामावरून घरी येताना तो दारू पिऊन येत असे. घरी आल्यावर पत्नी व मुलांना मारहाण करून घरातून निघून जा अशी दमदाटी करीत असे. 5 जून 2011 रोजी सकाळी 11 वा. असे घडले. अहमजदच्या दररोजच्या त्रासाला वैतागलेल्या शहेनाज हिने मुलांच्या मदतीने त्याला पलंगाला बांधले व लाकडाने मारहाण केली. हे समजल्यावर दुपारी साडेचार वाजता युसूफ याने मावसभाऊ रहिमान शेख (रा. टिकेकरवाडी) याला बोलावून घेतले. तो आल्यावर त्याची मावशी, आरोपी शहेनाज व मुले घराबाहेर बसली होती. काय झाले असे विचारल्यावर तिने नवर्याला बांधून घातल्याचे सांगितले. मुलांनी कुलूप उघडल्यावर रहिमान आत गेला. त्याला अमजद जखमी अवस्थेत आढळला. रहिमानने त्याची सुटका केली. पुन्हा भांडण करू नका, अमजदला दवाखान्याला न्या असे बजावून तो घरी गेला. दुसर्या दिवशी सकाळी अमजद हा घरी मृतावस्थेत आढळला.
विजापूर नाका पोलिसांनी शहेनाज व तिच्या दोन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. खटल्याच्या सुनावणीवेळेस सरकारतर्फे 8 साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी रहिमान, त्याचा मावसभाऊ युसूफ, गुलाब शेख, जमीर शेख, डॉ. अनिल हुलसवाकर, सपोनि ए. ए. शेख यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने शहेनाजविरुद्ध खटला चालवून तिला दोषी ठरविले. यात सरकारतर्फे अँड. रामदास वागज, मूळ फिर्यादीतर्फे शेखर टोणपे, बी. एस. लेंडवे तर आरोपीतर्फे डी. ए. मुल्ला, रजाक शेख यांनी काम पाहिले.