चपळगाववाडी परिसरातील शिवारामध्ये वन्य जीवांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:47+5:302021-04-20T04:22:47+5:30
ससा, कोल्हा, लांडगा, हरीण, मोर, घोरपड, रानडुक्कर व इतर पशूपक्षी चपळगाव चपळगाववाडी, हालहळ्ळी, दहिटणेवाडी, बऱ्हाणपूर व परिसरातील शिवारामध्ये संचार ...
ससा, कोल्हा, लांडगा, हरीण, मोर, घोरपड, रानडुक्कर व इतर पशूपक्षी चपळगाव चपळगाववाडी, हालहळ्ळी, दहिटणेवाडी, बऱ्हाणपूर व परिसरातील शिवारामध्ये संचार करताना दिसतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे प्राणी सकाळी व संध्याकाळी अन्नाच्या शोधात रानावनात भटकंती करताना आढळतात. याच संधीचा फायदा घेऊन शिकारी त्यांची शिकार करत आहेत. वन्यप्राण्यांची शिकार करणे यावर बंदी असतानाही हालहळ्ळी, चपळगाववाडी व परिसरातील शिवारामध्ये वन्य जीवांची शिकार केली जाते. संध्याकाळी रात्रीच्या वेळी शिकार केलेल्या वन्यजीवांची विक्रीही केली जात असते.
असाच एक शिकारी वन्यप्राणी घेऊन जाताना चपळगाव येथील डॉ. सारंग पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जखमी सशाला ताब्यात घेतले व त्याच्यावर उपचार केले. त्याला दूध व खाद्यपदार्थ दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्यावर उपचार करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले. अशा प्रकारे वन्यजीवांची शिकार होवू नये म्हणून संबंधित वन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----
वन्यप्राणी हे निसर्गातील महत्त्वाचे घटक आहेत. पशूपक्षी यांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील वन्यजीवप्रेमी कुरनूर धरण व परिसरात येत असतात. वन्यजीवांची शिकार करणे हे गैर आहे. त्या जीवांची शिकार न करता त्यांचे रक्षण करावे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.
- डॉ. सारंग पाटील, चपळगाव
----