सोलापुरात डिजिटल फ्लेक्स लावणार? मग परवानगी आवश्यक, अन्यथा...
By Appasaheb.patil | Published: September 22, 2023 04:04 PM2023-09-22T16:04:54+5:302023-09-22T16:05:17+5:30
या प्रणालीमध्ये पोलीस स्टेशनची एनओसी देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. परवानगी देताना परवानगी सोबत एक QR कोड देण्यात येणार आहे.
सोलापूर : शहरात होर्डिंग, डिजिटल फ्लेक्स लावण्याकरिता सोलापूर महानगरपालिके मार्फत ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. परवानगी दिल्यानंतर परवानगी सोडून इतर ठिकाणी किंवा परवानगीच्या साईजच्या पेक्षा मोठी किंवा परवानगीच्या कालावधी व्यतिरिक्त इतर दिवशी सदरचे होर्डिंग लावल्यास प्रति दिवस प्रति होर्डिंग रक्कम रुपये १ हजार रूपये इतका दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिले.
या प्रणालीमध्ये पोलीस स्टेशनची एनओसी देखील ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. परवानगी देताना परवानगी सोबत एक QR कोड देण्यात येणार आहे. सदरचा देण्यात आलेला क्यूआर कोड हा होर्डिंग वरती छापणे बंधनकारक आहे. सदरचे परवानगी हे पाच दिवसाच्या कालावधीत अर्जदारास मिळेल. नागरिकांनी कमीत कमी पाच दिवस अगोदर परवानगी करिता अर्ज करणे बंधनकारक आहे. तात्पुरत्या होर्डिंग, फ्लेक्सची अधिकतम आकार ठरवून दिलेल्या मर्यादेतच लावण्यात यावा.
सोलापूर महानगरपालिकेने शहरातील होर्डिंग लावण्याकरिता जागा निश्चिती वाहतूक शाखेच्या नाहरकती नंतर करण्यात आलेली आहे.या जागा व्यतिरिक्त इतर ठिकाणी होर्डिंग लावता येणार नाही. अन्य ठिकाणी होर्डिंग लावल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराचे आधार कार्ड व लावण्यात येणाऱ्या डिजिटल फ्लेक्स चे डिझाईन अपलोड करून अर्ज करता येऊ शकणार आहेत.