भाजपच्या कुटनितीचा भांडाफोड करणार; सिद्धाराम म्हेत्रे : एक ऑक्टोंबर पासून जनसंवाद यात्रा काढणार
By संताजी शिंदे | Published: September 18, 2023 07:52 PM2023-09-18T19:52:23+5:302023-09-18T19:52:52+5:30
अक्कलकोट : भोळ्या बाभड्या जनतेला अनेक प्रकारचे आश्वासने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात ...
अक्कलकोट : भोळ्या बाभड्या जनतेला अनेक प्रकारचे आश्वासने दाखवून सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात येत्या एक ऑक्टोबर पासून जनसंवाद यात्रा काढणार आहे. जनतेला पद्धतशीरपणे फसवणाऱ्या भाजपच्या कुटनितीचा भांडाफोड या यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचे माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जाहीर केले.
रविवारी अक्कलकोट येथील कॉंग्रेस कमिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी म्हेत्रे म्हणाले की, सरकारच्या अडमुठ्या धोरणांमुळे गोरगरीब जनतेला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. शंभर दिवसांत महागाई कमी करणार असे खोटे आश्वासन मोदींनी दिले होते. गॅसच्या वाढत्या किमतीमुळे घराघरातील महिला त्रस्त आहेत. सत्तेचा गैरवापर सुरु असून, सरकार विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मणिपुर प्रकरणामुळे घराघरातील महिला असुरक्षित झाल्या आहेत.
जातिभेद वाढला आहे. अन्याय अत्याचाराने कळस गाठला आहे. या सर्व गोष्टी लोकशाहीला घातक ठरणार असून, प्रत्येक घरात जागृती व्हावी यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनसंवाद यात्रा काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वामी समर्थ मंदिर आणि हैद्रा येथील दर्गातून ही यात्रा निघणार आहे. दररोज दहा-बारा गावांमध्ये ही जनसंवाद यात्रा काढणार आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील, मल्लिकार्जुन काटगांव, ॲड. आनंदराव सोनकांबळे, धोंडप्पा येळमेली, सिध्दाराम भंडारकवठे, शाकीर पटेल, नितीन ननवरे, शिवराज पोमाजी, विनीत पाटील, मुबारक कोरबु यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.