पारदर्शक तलाठी भरती न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा इशारा
By संताजी शिंदे | Published: August 29, 2023 04:40 PM2023-08-29T16:40:23+5:302023-08-29T16:41:24+5:30
राज्य शासनाच्या विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.
सोलापूर: पारदर्शक तलाठी भरती न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा, एमपीएससी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत शिरूर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन आजारी दिला आहे.
राज्य शासनाच्या विविध सरळ सेवा परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पेपर फुटी संदर्भात विधिमंडळात कायदा करावा आणि २०१९ ची तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात एसआयटी नेमून चौकशी करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली आहे. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यानंतर २०२३ ची तलाठी परीक्षेमध्ये सुद्धा गैरप्रकार आढळून येत आहे. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर घोटाळाबाजांचा सुळसुळाट वाढत आहे. दलाल,भ्रष्ट अधिकारी आणि घोटाळाबाज्यांच्या माध्यमातून पेपर फोडण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे ही या परीक्षेत गोंधळ निर्माण झाला आहे. ही परीक्षा ताबडतोब थांबून पुन्हा एकदा नामांकित व चांगल्या कंपनीला परीक्षा घेण्यास परवानगी देऊन लाखो विद्यार्थ्यांना जे की होतकरू प्रामाणिक, योग्यताधारक आहेत अशा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा परिक्षा संदर्भात आम्हांस रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
शासन विद्यार्थ्यांचे आर्थिक खच्चीकरण करत आहे -
- महाराष्ट्र शासनाच्या सर्वच परीक्षांमध्ये असे घोटाळे होत असेल तर ही परीक्षा घेऊन प्रशासन गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचा महसूल गोळा करून विद्यार्थ्यांचे आर्थिक, मानसिक खच्चीकरण करत आहे.
- सोलापूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर सुद्धा शासनाने कडक असे बंदोबस्त ठेवला पाहिजे जर परीक्षा पारदर्शकपणे नियोजनबद्ध व वेळेत घेऊन न्याय देता येत नसेल तर आम्हाला उच्च न्यायालयात जावा लागेल व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर लवकरात लवकर आम्ही उतरणार आहोत, असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.