दहा रुग्ण असलेली गावे प्रतिबंधित करणार; सोलापूर ग्रामीणमधील होम आयसोलेशन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 06:02 PM2021-07-30T18:02:35+5:302021-07-30T18:02:45+5:30
सोलापूर : ग्रामीण भागात कोरोना संसर्गात होत असलेली वाढ रोखण्यासाठी १० रुग्ण आढळलेली गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावीत, ...
सोलापूर : ग्रामीण भागात कोरोना संसर्गात होत असलेली वाढ रोखण्यासाठी १० रुग्ण आढळलेली गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावीत, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. ग्रामीण भागात काेरोना संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून आल्यावर सीईओ स्वामी यांनी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून उपाययोजना कडक करण्याच्या सूचना केल्या.
कॉन्फरन्समध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते. जिल्ह्यात सांगली, सातारा व पुणे सीमेलगत असलेल्या पंढरपूर, माढा, करमाळा तालुक्यांत रुग्णवाढ कायम आहे. अनलॉक असल्याने लोकांची ये- जा कायम आहे. कोरोना संसर्गावर प्रतिबंध आणण्यासाठी ज्या गावात १० पेक्षा जास्त रुग्ण असतील ती गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करा, तसेच शहरात गल्ली किंवा प्रभाग प्रतिबंधित करून बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्या. चाचण्या वाढवा, अशा सूचना केल्या. होम आयसोलेशन बंद करावे, अशी विनंती तहसीलदारांनी केली. याबाबत आदेश काढावेत, असेही सुचविण्यात आले.
५५६ रुग्ण आढळले
जिल्ह्यात गुरुवारी १० हजार ४०० चाचण्यांत ५५६ रुग्ण बाधित आढळले, तर ग्रामीणमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात १ हजार १३२ चाचण्यांत फक्त ८ बाधित आढळले, तर एकाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. ग्रामीणमध्ये ९ हजार २६८ चाचण्यांत ५४८ बाधित आढळले. शहरात ९९, तर ग्रामीणमध्ये ३ हजार ४९८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.