सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडणार की ठेवणार? आज कोर्टात सुनावणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 12:17 PM2022-01-17T12:17:23+5:302022-01-17T12:17:30+5:30
कोर्टात सुनावणी : सोलापूर विकास, विचार मंचचे हस्तक्षेप अर्ज
सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकाम प्रकरणावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. चिमणी स्वत:हून पाडणार की ठेवणार, याबद्दल कारखाना स्पष्टीकरण देणार आहे. या प्रकरणात सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंचने हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष आहे.
महापालिकेने सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाची कारवाई सुरू केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंदची नोटीसही दिली. यादरम्यान कारखान्याने उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली. गाळप हंगाम सुरू असल्याने कारवाई करू नये असे कारखान्याचे म्हणणे आहे. या याचिकेवर डिसेंबर महिन्यात सुनावणी झाली. चिमणी स्वत:हून पाडून घेणार का? अशी विचारणा न्यायालयाने केली होती. यावर कारखान्याने म्हणणे मांडण्यासाठी १७ जानेवारीची मुदत मागितली होती. आता सोमवारी सुनावणी होणार आहे. कारखान्याकडून न्यायालयात काय उत्तर दिले जाते याकडे लक्ष असणार आहे.
दरम्यान, विकास मंचचे केतन शहा म्हणाले, गिरीकर्णिक फाउंडेशनमार्फत हा अर्ज दाखल केला आहे. चिमणीचे बांधकाम बेकायदेशीर आहेच. पण यामुळे सोलापूरची विमानसेवा सुरू होत नाही. सोलापूरचा विकास रोखण्याचे काम सुरू आहे. या चिमणीमुळे सोलापूर शहरावर बेरोजगारी, प्रदूषणाचे मोठे संकट ओढविले आहे. सोलापूरचे वकील प्रसाद पाटील हे न्यायालयात सोलापूरकरांची बाजू मांडणार आहेत. यात महापालिकेने यापूर्वी केलेली कारवाई, घडलेले प्रकार, विमान प्राधिकरणाकडून झालेला पत्रव्यवहार असे अनेक मुद्दे उपस्थित केले जातील. चिमणी पाडकामात वेळकाढूपणा सुरू आहे. त्यासाठी आम्हाला पाठपुरावा करावा लागतोय.