कोणत्याही परिस्थितीत होटगी रोडवरील विमानसेवा सुरू करणार; महापौरांनी केला निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 01:12 PM2020-12-10T13:12:24+5:302020-12-10T13:12:30+5:30
सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी घेतली भेट
सोलापूर : विकासासाठी होटगी येथील विमानसेवा सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना महापालिकेतर्फे पत्र देण्यात आले आहे. होटगी रोडवरील विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितले.
सोलापूर शहराच्या विकासावर व विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी मंगळवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांची भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी ही माहिती दिली. होटगी रोडवरील विमानतळ मागील आठ वर्षापासून तयार आहे. चिमणीचा जो अडथळा आहे, त्याबाबत न्यायालयाने निकाल शासनाच्या बाजूने दिले आहेत. तरीही शासनाचे प्रतिनिधी असलेले जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्याकडून सोलापूरकरांची दिशाभूल करीत असल्याचे सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी महापौरांना सांगितले.
यावेळी सभागृहनेते श्रीनिवास करली, नगरसेवक विनायक विटकर, नागेश भोगडे, संजय कणके, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मिलिंद भोसले, विजय जाधव, खतीब वकील, प्रमोद शहा आदी उपस्थित होते.
तर मीच अवमान याचिका दाखल करेन....
होटगी विमानतळासाठी चिमणीचा अडथळा ठरत आहे, त्यासंदर्भात न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यांच्या कार्यवाहीसाठी मी स्वत: पुढाकार घेऊन आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून न्यायालयाच्या निकालाचे पालन करा व अवमान होऊ देऊ नका नाहीतर मलाच अवमान याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिला.
सोलापूरच्या विकासासंदर्भात आम्ही महापौरांची भेट घेतली. विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. लवकरच जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्यासोबत बैठक लावू. त्या बैठकीला सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना बोलाविण्यात येईल, असे सांगितले. याशिवाय सोलापूरच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा झाली.
- केतन शहा,
उद्योजक, सोलापूर