सत्कारात दिसलेली एकजूट विधानसभेपर्यंत टिकणार काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 07:38 PM2019-08-28T19:38:44+5:302019-08-28T19:41:20+5:30
मिलिंद थोबडेंची शहर उत्तर मोहीम; सर्वपक्षीय उमेदवार ठरले तरच लागू शकतो निभाव
राकेश कदम
सोलापूर : एरवी कायद्याचा कीस पाडणारे वकील मिलिंद थोबडे यांनी रविवारी ‘शब्दांचा कीस’ पाडून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याविरुद्ध मैदानात उतरण्याचे सूतोवाच केले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना शहर उत्तर विधानसभेची ‘अर्धी केस’ जिंकल्याचा आनंद झाला आहे. परंतु, सत्कार कार्यक्रमात दिसलेली एकजूट निवडणुकीपर्यंत कायम राहील का? याबद्दल राजकीय तज्ज्ञ शंका व्यक्त करीत आहेत.
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अॅड. मिलिंद थोबडे यांचा रविवारी लिंगायत समाजातील नेते आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून जाहीर सत्कार करण्यात आला.
हा सत्कार शहर उत्तर विधानसभेच्या तयारीसाठीच होता. शहर उत्तरमधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख पाचव्यांदा रिंगणात उतरणार आहेत. दरवेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी शहर उत्तरमधील काही भाजपचे नेते विजयकुमार देशमुख यांच्याविरुद्ध बंड पुकारतात. देशमुखांनी ‘खिसा झटकला’ की काही जण ‘मॅनेज’ होतात तर काही जण हताश होऊन बाजूला पडतात. यंदा पुन्हा देशमुखांविरुद्ध बंडाची भाषा होऊ लागली आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर देशमुखांनी अनेकांना झटके दिले आहेत.
गत दोन वेळचे अनुभव पाहता यंदा देशमुखांना जास्त विरोध होईल, अशी चिन्हे आहेत. दरवेळी देशमुखांना विरोध व्हायचा, पण सक्षम पर्याय नव्हता.
अॅड. मिलिंद थोबडे हा चांगला पर्याय होऊ शकतो, असे भाजपमधील देशमुख विरोधी गटाला वाटते.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनाही थोबडे हाच सक्षम पर्याय वाटतोय. यातून रविवारचा सत्कार कार्यक्रम घडवून आणण्यात आला होता.
तर सर्वपक्षीय पुरस्कृत करा
- राजकीय चर्चेला सुरुवात झाल्यानंतर थोबडेंनी सावध प्रतिक्रिया दिली होती. परंतु, सत्काराच्या तयारीतून नवे संकेत मिळाले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती महेश थोबडे आणि थोबडे कुटुंबीयांनी बरीच मेहनत घेतली. त्यांच्या समाजातील नाराज लोक, विविध पक्षांचे प्रमुख नेते यांना आवर्जून निरोप देण्यात आले. थोबडेंनी पालकमंत्र्यांना आव्हान देताना भाजप हा प्राधान्यक्रम ठेवला. भाजप नसेल तर मिलिंद थोबडे यांना सर्वपक्षीय पुरस्कृत उमेदवार करण्यात यावे, असे थोबडे यांच्या निकटवर्तीयांचे मत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी वगळता इतर पक्ष थोबडे यांच्या या भूमिकेला तयार होतील का? याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.
तर शिवधनुष्य अंगावर कोसळेल
- भाजप-सेनेची युती झाल्यास थोबडेंचा निभाव लागणे अशक्य आहे. आज थोबडेंना मुंबईत ‘मातोश्री’वर घेऊन जातो, असे सांगणाºया महेश कोठेंना शहर मध्यमधून उसंत मिळणार नाही. युती न झाल्यास थोबडे शिवसेनेकडून लढू शकतात. पण काँग्रेस-राष्टÑवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे आजचे ‘साक्षीदार ऐनवेळी फुटल्यास’ थोबडे यांच्या अंगावर शिवधनुष्य कोसळू शकते. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार हाच पर्याय आहे. अन्यथा ही ‘शहर उत्तरची केस’ थोबडे यांच्या हातून निसटून जाणार आहे, अशी कुजबूज सुरू झाली आहे.
स्वाभिमानी बाणा...
- पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची शहर उत्तर विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड आहे. त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. दिमतीला नगरसेवक आहेत. मंत्रिपद, बाजार समितीचे सभापतीपद यामुळे त्यांच्या गंगाजळीत भर पडलेली आहे. आज थोबडे यांना पुढे करून स्वाभिमानी बाणा सांगणारे लोक उद्या एकेक करीत देशमुखांच्या वाड्यावर जाऊ शकतात, असेही भाजपमधील लोक बोलतात.