पक्षात कार्यरत राहणार, पण लाेकसभा लढणार नाही : सुशीलकुमार शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:10 PM2022-12-28T12:10:57+5:302022-12-28T12:11:54+5:30
मागील लाेकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी अशाच प्रकारचे मत व्यक्त केले हाेते
राकेश कदम
आगामी लाेकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्टीकरण काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी दिले. मागील लाेकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी अशाच प्रकारचे मत व्यक्त केले हाेते.
काॅंग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त येथील काॅंग्रेस भवनात बुधवारी सकाळी ध्वजाराेहण कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलताना शिंदे म्हणाले, "काॅंग्रेसचा आज स्वाभिमानाचा दिवस आहे. काॅंग्रेसचा झेंडा हातात घेउन निघालेली आमची मंडळी देशात पुन्हा परिवर्तन करतील यात शंका नाही. मी यापुढील काळात निवडणूक लढविणार नाही. पक्षात कार्यरत राहीन."
"महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतच राहणार आहेत. मी मुख्यमंत्री असताना सीमावाद विषय सर्वाेच्च न्यायालयात घेऊन गेलाे. आता राज्य सरकारने याबद्दल भूमिका स्पष्ट करायला हवी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना आणखीन कार्यकाळ पूर्ण करायचा आहे," असेही ते म्हणाले.