वॉटर कप जिंकण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील २६ गावे सरसावली
By Appasaheb.patil | Published: April 24, 2019 01:17 PM2019-04-24T13:17:49+5:302019-04-24T13:21:26+5:30
सध्याची पाण्याची टंचाई पाहता गावकºयांनी श्रमदानातून पाणी अडविण्याची कामे सुरू केली आहेत.
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप जिंकण्यासाठी २६ गावे सरसावली असून श्रमदानाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. शोषखड्डे, सीसीटी, नालाबांध, गाळ काढण्याची कामे गावोगावी सुरू आहेत.
वॉटर कप स्पर्धेसाठीचे हे उत्तर तालुक्याचे तिसरे वर्ष असून, या वर्षी वॉटर कप स्पर्धेत भाग घेणाºया गावांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी जवळपास १८ गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला होता. यावर्षी हीच संख्या २६ इतकी झाली आहे. भागाईवाडी, कळमण, वांगी, पडसाळी, गावडीदारफळ, वडाळा, रानमसले, साखरेवाडी, नान्नज, अकोलेकाटी, कोंडी, गुळवंची, बाणेगाव, भोगाव, होनसळ, राळेरास, एकरुख, नरोटेवाटी, खेड, हिरज, कवठे, डोणगाव, नंदूर-समशापूर आदी गावात श्रमदानातून विविध कामे सुरू आहेत. बीबीदारफळ या गावातही श्रमदानाला सुरुवात झाली आहे. ८ एप्रिल रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असली तरी लोकसभा निवडणुकीनंतर कामाला अधिक वेग येईल, असे सांगण्यात आले.
पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याने शोषखड्डे खोदण्यावर भर देण्यात आला आहे. रानमसले, नान्नज, वांगी या गावात शोषखड्डे घेण्यात आले आहेत. रानमसलेच्या महिलांनी वॉटर कपचे काम चांगलेच मनावर घेतले असल्याचे दिसत आहे.
कळमण गावातही मोठ्या जिद्दीने काम सुरू आहे. शोषखड्डे, सीसीटी खोदण्याची कामे सुरू असून, काही गावात तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे तसेच ओढ्याच्या खोदाईची कामेही हाती घेतली आहेत.
कौठाळी, मार्डी अन् बीबीदारफळ..
- उत्तर सोलापूर तालुक्यात ४० गावे व ३६ ग्रामपंचायती असून, सीना नदीकाठालगत पाच गावे आहेत. या गावातील नागरिकांना सीना नदी व उजनी कालव्याचे पाणी मिळत असल्याने श्रमदानासाठी कोणी पुढाकार घेत नाही. सध्या टँकर सुरू असलेल्या कौठाळी, बीबीदारफळ व मार्डी गावात श्रमदानासाठी युवक पुढे येत नाहीत. रानमसले, वांगी, कळमण ही गावे यावर्षी मोठ्या जिद्दीने श्रमदानात सहभागी झाली आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास २६ गावांमध्ये श्रमदानातून कामे सुरू असून, अन्य काही गावांचाही सहभाग होत आहे. सध्याची पाण्याची टंचाई पाहता गावकºयांनी श्रमदानातून पाणी अडविण्याची कामे सुरू केली आहेत.
- आशिष शिरगिरे, समन्वयक, पाणी फाउंडेशन, उत्तर तालुका