एका दिवसातच माळशिरस बसस्थानकाचं रुपडं पालटलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:22 AM2021-09-25T04:22:29+5:302021-09-25T04:22:29+5:30
माळशिरस : नवं बसस्थानक बनलंय खासगी वाहनतळ... या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बसस्थानक परिसरातील खड्डे तर अस्वच्छता, वाढलेले गवत व खासगी ...
माळशिरस : नवं बसस्थानक बनलंय खासगी वाहनतळ... या मथळ्याखाली ‘लोकमत’ने बसस्थानक परिसरातील खड्डे तर अस्वच्छता, वाढलेले गवत व खासगी वाहनांचे पार्किंग याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल एसटी महामंडळाने घेतली असून परिसरातील गवत काढणी, तणनाशक फवारणी, बसस्थानकाची पाण्याने धुऊन स्वच्छता, गेटवरील खड्डे भरले, तर खासगी पार्किंगबाबत पोलीस, नगरपंचायतीला पत्रव्यवहार आदी वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे बसस्थानकाचं रुपडं अवघ्या एका दिवसात पालटल्याचे दिसत आहे.
बसस्थानक परिसरात विविध समस्या भेडसावत होत्या. याबाबत वाहतूक नियंत्रकांनी संबंधितांना वेळोवेळी पत्रव्यवहार केले. तरीही याबाबत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता; मात्र एसटी महामंडळाने याबाबत तातडीने विविध उपाययोजना केल्यामुळे अवघ्या काही तासातच परिसर स्वच्छ करण्यात आला. गवतावर तणनाशक फवारण्यात आले. तर ये-जा करणाऱ्या मुख्य फाटकाच्या बाजूच्या रस्त्यावरील खड्डेही बुजवण्यात आले. नगरपंचायत, पोलीस प्रशासन, वरिष्ठ कार्यालयासह विविध सुविधांसाठी संबंधित विभागांना तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला. सध्या बसस्थानकाचं रुपडं पालटल्याने नागरिकांच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होते.