सोलापूर जिल्ह्यातील ११८९ अंगणवाड्या शौचालयाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:55 AM2019-01-11T11:55:13+5:302019-01-11T11:58:03+5:30
सोलापूर : जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र सुरू होऊन ४५ वर्षे होत आली तरी ११८९ अंगणवाडी केंद्रात शौचालय नाही तर अजूनही ...
सोलापूर : जिल्ह्यात अंगणवाडी केंद्र सुरू होऊन ४५ वर्षे होत आली तरी ११८९ अंगणवाडी केंद्रात शौचालय नाही तर अजूनही ६७६ अंगणवाड्यांना छत नसल्याने लहान मुले उघड्यावर शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवताहेत.
झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी नुकताच एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत झेडपीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाºया अंगणवाड्यातील सुविधांचा आढावा घेतला. जिल्ह्यात अक्कलकोट, बार्शी, वैराग, करमाळा, माढा, टेंभुर्णी, माळशिरस, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर :१ व २, सांगोला, कोळा, उत्तर व दक्षिण सोलापूर या ठिकाणी ३२६९ इतक्या मोठ्या अंगणवाड्या आहेत. यामध्ये स्वत:ची इमारत असणाºया २५९३ इतक्या अंगणवाड्या आहेत. ६७६ अंगणवाड्यांना इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाडी केंद्रातील मुले उघड्यावर शिक्षणाचे प्राथमिक धडे घेतात. पावसाळा व थंडीत या केंद्रातील मुलांचे हाल होतात. गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही वस्तुस्थिती आहे.
केवळ १३३ अंगणवाड्यात वीज कनेक्शन आहे तर ३१३६ इतक्या अंगणवाड्यांमध्ये वीज कनेक्शन नाही. सरकार शहर व गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणावर योजना राबवत आहे. पण अद्याप ११८९ इतक्या अंगणवाड्यात शौचालय नाही. फक्त ३६१ अंगणवाडीतील मुलांना शुद्ध पाणी मिळते. २९०८ अंगणवाडीतील मुलांना शुद्ध पाणी पिण्याची सोय नाही. अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार उपलब्ध केला जातो. तरीही १५८१ अंगणवाडी केंद्रात गॅस शेगडीची उपलब्धता नाही. शासन दरवर्षी हातधुवा दिन साजरा करते. हात धुण्यामुळे अनेक रोगांचा प्रतिबंध होऊ शकतो याचा प्रसार केला जातो. पण ३0७३ इतक्या अंगणवाड्यात हात धुण्यासाठी वॉश बेसीन उपलब्ध नाही. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राची आज अशी अवस्था आहे.
हे चित्र बदलणार
च्जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातून सुमारे दोन लाख बालके प्राथमिक शिक्षणाचे धडे घेत आहेत. पण याच केंद्राची ही दुरवस्था आहे. शिक्षणाबरोबर बालकांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी काळात हे चित्र बदलण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. वित्त आयोग, ग्रामपंचायतीकडील निधी व लोकवर्गणीतून अंगणवाड्यात या सुविधा उपलब्ध केल्या जातील. तशा सूचना महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात अंगणवाड्यांना शौचालय, वॉटर फिल्टर, गॅस शेगडी आणि वीज कनेक्शन देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.