विनामास्क तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं राव, तिनंही सांगितलं, मॅचिंगचा मास्क मिळालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 08:42 AM2021-11-19T08:42:28+5:302021-11-19T08:42:38+5:30
अचंबित करणारी कारणे; १८ ते ४० वयोगटातील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक
यशवंत सादूल
सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असताना शहरातील निम्मे नागरिक मास्कविना बिनधास्त फिरताना दिसून येत आहेत. यामध्ये अठरा ते चाळीस वयोगटातील नागरिकांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मास्क न वापरण्याबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडून अचंबित करणारी कारणे ऐकावयास मिळाली. दरम्यान, एका रिक्षाचालकाने, सारखं थुकावं लागतं राव, त्यामुळं मास्क वापरत नाही, तर एका महिलेने, पोशाखाला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळं मी घातला नसल्याचे कारण सांगितले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवी वेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रंगभवन, सात रस्ता, महापालिका, जिल्हा परिषद, सिव्हिल चौक, पद्मशाली चौक, कन्ना चौक, कोतंम चौक, अशोक चौक परिसरातील दुचाकी वाहनस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहनचालक, सायकलस्वार आणि पादचारी यांचे सर्वेक्षण केले असता पन्नास ते साठ टक्के मास्कविना फिरणारे नागरिक आढळून आले. दहा ते पंधरा टक्के हे मास्क हनुवटीला लावलेले होते. फक्त पंचवीस ते तीस टक्के नागरिक प्रामाणिकपणे मास्क वापरताना आढळून आले. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.
--------
ही आहेत मास्क न वापरण्याची कारणे...
मास्क न वापरण्याची कारणे विचारली असता रोहितेश वाळके यांनी कोरोना संपलेला आहे, आता मास्कची काय गरज आहे का? असा प्रतिप्रश्न करीत मागील तीन महिन्यांपासून मी मास्क वापरत नाही, असे सांगितले. रिक्षाचालक सुनील कराळे यांनी थुंकण्यासाठी अडचणीचे ठरू नये यासाठी वापरत नाही, असे सांगितले, तर उन्हामुळे घाम येऊन सारखे नाक खाजवते त्यामुळे फुटकुळ्या होत आहेत, असे पंडित वाघमारे यांनी सांगितले. स्नेहा कोळी या तृतीयपंथीयाने तर शृंगार केलेले लिपस्टिक पुसून जाऊ नये यासाठी, दोन्ही मुलांची काळजी घेत त्यांना मास्क लावून काळजी घेणारी मोटारसायकलस्वार अर्पिता गोसावी यांनी पोशाख अनुरूप मॅचिंग मास्क सापडत नव्हते. त्यामळे लावले नाही, असे सांगितले. सारखा दम लागतोय, हे कारण मात्र सर्वांत जास्त नागरिकांनी सांगितले. पान आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणे आणि थुंकता यावे यासाठी मास्क वापरत नसल्याचे बहुतेक नागरिकांनी सांगितले.
-------
दोन लस घेतल्या, आता कशाला मास्क घालू
‘लोकमत’च्या सर्वेक्षणात एका मोटारस्वाराने दोन लस घेतल्या, आता कशाला मास्क घालू, असे उत्तर दिले. याशिवाय मागील वर्ष, दीड वर्षापासून मास्क वापरून कंटाळा आला, मोकळी हवा घेण्यासाठी, गडबडीत विसरलो, मास्क गाडीतच विसरलो, असे सुभाष जळकोटकर यांनी सांगितले. इरप्पा माशाळ नाक सुजत असल्याचे, नागपूरहून आलेले प्रवासी अरुण गेडाम यांनी चिक्कू खाण्यासाठी मास्क काढला, यासह पिशवीत आहे, गाडीला अडकवलेला आहे, कोणी विचारत नाही, अनेक सरकारी कार्यालयांत, आरोग्य कर्मचारी, पोलीस मास्क वापरत नाहीत. मास्क विचारायला आम्हीच सापडलो का? अशी अनेक गमतीदार आणि मनोरंजक कारणे नागरिकांनी सांगितली असली तरी दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आणि त्याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे आहे.