साक्षीदार कोर्टाचा पाहुणा असावा : उज्ज्वल निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:42 PM2017-10-14T15:42:22+5:302017-10-14T15:45:43+5:30
तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १४ : तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज येथे व्यक्त केली.
येथील बीएमआयटी महाविद्यालयाच्या विचार मंथन कार्यक्रमात प्रकट मुलाखतीदरम्यान ते बोलत होते़ त्यावेळी त्यांनी पत्रकार समीरण वाळवेकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनी मोकळेपणे उत्तरे दिली. यावेळी माजी आमदार दिलीप माने उपस्थित होते़
निकम म्हणाले, पोलिसांकडून फार अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे़ कारण हे लोक बंदोबस्तात, कायदा सुव्यस्था राखण्यात व्यग्र असतात. तपास यंत्रणेत सोयीचे होण्यासाठी पोलिसांना कायद्याचे शिक्षण द्यायला हवे. कोर्टात येणाºया साक्षीदाराला योग्य मानधन द्यायला हवे. शिवाय त्यांच्या भोजनाचीही काळजी घेतली पाहिजे.
गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्यात आपला पुरावा ब्रिटिश कायद्यानुसार तो देश तपासतो, हे चुकीचे असल्याचे निकम यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. एखाद्या देशाने गुन्हेगाराविरुध्द अजामीनपात्र वाँरंट जारी केल्यानंतर समोरच्या देशाने त्याचा सन्मान करायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.