पुण्याची साक्षी शेलार ताराराणी चषकाची मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 03:54 PM2019-03-04T15:54:37+5:302019-03-04T15:55:57+5:30
अकलूज : शंकरनगर-अकलूज येथे शिवतीर्थ आखाड्यात प्रथमच भरविण्यात आलेल्या महिलांच्या ताराराणी चषक कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या साक्षी शेलारने सुरवड (ता. ...
अकलूज : शंकरनगर-अकलूज येथे शिवतीर्थ आखाड्यात प्रथमच भरविण्यात आलेल्या महिलांच्या ताराराणी चषक कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या साक्षी शेलारने सुरवड (ता. इंदापूर, जि. पुणे) च्या गीतांजली पांढरेवर गुणांवर मात करत ताराराणी चषकावर आपले नांव कोरत पहिला ताराराणी चषक पटकाविला.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती, महाशिवरात्र यात्रा समिती व प्रताप क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांची १०१ वी जयंती, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची ५१ वी पुण्यतीथी व खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ आखाड्यात वजन गट, त्रिमुर्ती चषक व ताराराणी चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या स्पर्धेत यंदा प्रथमच महिलांच्या ताराराणी चषक कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेतील अंतिम फेरीत ताराराणी चषकासाठी पुण्याच्या साक्षी शेलार व सुरवडच्या गीतांजली पांढरे यांच्यात झुंज लागली. १५ मिनिटे बेमुदत निकाली सुरू झालेल्या कुस्तीत दोन्ही कुस्ती पटुंनी एकमेकांचे डाव व ताकदीचा अंदाज घेत डावपेच टाकले. १५ मिनिटांत दोघींचे गुण न झाल्याने आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमानुसार वाढिव ६ मिनिटे देण्यात आली.त्यातील ३ मिनिटांच्या पहिल्या फेरीत साक्षीने २ गुण व गीतांजलीने २ गुण मिळवले. दोघींचे पहिल्या फेरीत समान गुण राहिले. दुस-या ३ मिनिटांच्या निर्णायक फेरीत साक्षीने गीतांजलीवर मात करत २ गुणांची निर्णायक आघाडी घेताना आपल्या हुकूमी डावावर दुहेरी पट काढून गीतांजलीवर मात केली व ताराराणी चषक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना सहकार महर्षि साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, यात्रा समितीचे कार्याध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, शिवामृत दुध संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते ताराराणी चषक व रोख बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेसाठी प्रमुख म्हणून राम सारंग, आखाडा प्रमुख नितीन शिंदे, सरपंच तानाजी केसरे, साईड पंच अभिजित माने, वेळाधिकारी अनिल बाबर यांनी काम पाहिले. तर स्पर्धेचे समालोचन सर्जेराव मोटे, बाजीराव पाटील यांनी केले.