स्वराज्याचा साक्षीदार रायरेश्वर विस्मृतीत
By admin | Published: December 17, 2014 10:17 PM2014-12-17T22:17:50+5:302014-12-17T22:52:45+5:30
पर्यटकांची गैरसोय : किल्ल्यावरील रस्ते, पिण्याच्या पाण्याकडे शासनाचे दुर्लक्ष
संजीव वरे - वाई -अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात परकीयांच्या गुलामगिरीतून रयतेची सुटका करण्याची ज्योत प्रज्वलित झाली अन् मोजक्या मावळ्यांनिशी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली... ते ठिकाण म्हणजे वाई तालुक्यातील रायरेश्वर. ३७० वर्षे उलटून गेलेल्या या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला रायरेश्वर सर्वांच्याच विस्मृतीत गेला आहे.
किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत वाई व भोरमार्गे जाण्यासाठी रस्ते आहेत. शासनाने शिडीचा कडा यापासून एक किलोमीटरचा रस्ता तयार केला तर किल्ल्याची चढाई सोपी होईल. पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
रयतेला परकीय आक्रमण, गुलामगिरीतून वाचवायचे असेल, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे गरजेचे आहे, हे ओळखून शिवरायांनी २७ एप्रिल १६४५ ला गिरिदुर्ग म्हणजेच रायरेश्वर येथे रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. हे मंदिर पांडवकालीन आहे. गडाचा विस्तार १६ किलोमीटर आहे. समुद्रसपाटीपासूनची उंची चार हजार मीटर असून, हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. वाई तालुक्याची हद्द गडाच्या पायथ्याला संपते. वाईहून धोम-खावलीमार्गे वाहनाने पायथ्यापर्यंत जाता येते. मात्र, गडावर पायऱ्या चढूनच जावे लागते. काही संस्थांनी लोखंडी शिड्या लावल्यामुळे गडावर जाणे सोपे झाले आहे.
रायरेश्वर मंदिराजवळ सर्वोच्च माक्याची टेकडी आहे. येथून विलोभनीय विहंगम दृष्य दिसते. उत्तरेला तुंग, तिकोना, लोहगड व विसापूर डोंगर दिसतात. तसेच प्रतापगड, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगडही दिसतात. गडावर सात रंगांची माती आढळते. पश्चिमेला नाखिंदा कडा आहे. गडावर जननी देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.
रायरेश्वर गडावर जंगम घराण्याची ४५ घरे असून, सुमारे साडेपाचशे लोकवस्ती आहे. गडावर पावसाळ्यात चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही. जनावरे दगावतात. मोठा आर्थिक फटका बसतो. शासनाने गडाची डागडुजी केली, तर पर्यटनस्थळ तयार होईल आणि स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळेल, अशी आशा लोकांना वाटते. येथील मुलांना समाज मंदिरात बसून शिक्षण घ्यावे लागते. वाहनांची सोय नसल्यामुळे माध्यमिक शिक्षणासाठी पाच तास पायपीट करत भोर किंवा वाई येथे जावे लागते. शिडीचा कडा हा एकमेव मार्ग आहे. वाहने गडाच्या पायथ्याला एखाद्या गावात लावावी लागतात. रायरेश्वर मंदिराजवळ गायमुखाचा झरा हाच पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. रस्ता, पाण्याची मोठी समस्या लोकांना भेडसावत आहे. शिवरायांनी जेथे स्वराज्याची शपथ घेतली, तो गड आज सर्वच बाबतीत दुर्लक्षित आहे.
चार महिने गडावरच मुक्काम
पावसाळ्यात चार महिने गडावरील नागरिकांना सूर्याचे दर्शन होत नाही. मुसळधार पाऊस, वादळी वारा, घनदाट जंगल, श्वापदांचा उपद्रव यामुळे नागरिक गडावरून खाली येत नाहीत. चार महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा अगोदरच करून ठेवला जातो. पावसाळ्यात रुग्णांची ससेहोलपट होते. रस्ता झाला, तर पायथ्याच्या गावांशी संपर्क ठेवता येऊ शकतो.
उन्हाळ्यात ग्रामस्थांना शिवकालीन झऱ्यातून पाणी आणावे लागते. त्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पर्यटकांचीही गैरसोय होते. शासनाने गडावर सुविधा द्याव्यात.
- गोपाळ जंगम, नागरिक, रायरेश्वर
रायरेश्वर गडावरील याच रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी मावळ्यांना घेऊन स्वराज्याची शपथ घेतली. हे मंदिर पांडवकाळातील असल्याचे सांगितले जाते.
स्थानिकांच्या मागण्या
शासनाने कायमस्वरूपी पाणी योजना सुरू करावी.
रायरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.
गडावर जाण्यासाठी रस्ता तयार करावा.