झेडपीच्या तीन शिक्षकांच्या पत्नींची ग्रामपंचायत आखाड्यात बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:55+5:302021-01-22T04:20:55+5:30
मोहोळ तालुक्यातील जि.प. शिक्षक व शिक्षक संघटना यांचा प्रामुख्याने तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आ. राजन पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर ...
मोहोळ तालुक्यातील जि.प. शिक्षक व शिक्षक संघटना यांचा प्रामुख्याने तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आ. राजन पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्याशी नजीकचा संबंध. अगदी शिक्षकांच्या तालुक्यातील पतसंस्थादेखील या त्यांच्या नावानेच आजवर सुरू आहेत. शिक्षक पतसंस्थांमधील निवडणूक असो किंवा इतर निवडणूक असो, या राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार या शिक्षक संघटना आजवर वाटचाल करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ते साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शिक्षकांच्या घरातील सदस्यांचा सहभाग आजवर दिसून आला.
मागील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पोखरापूर येथील जि.प. शिक्षक राजकुमार वाघमारे यांची पत्नी सिंधू वाघमारे या राष्ट्रवादीमधून निवडून आल्या होत्या.
कामती खुर्द येथील जि.प. शिक्षक सुरेश माने यांची पत्नी शुभांगी माने या सलग तिसऱ्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी उपसरपंच व सरपंच म्हणून कार्य केले आहे. त्यांचे शिक्षण १० वी पर्यंत झाले आहे. यावेळी प्रभाग क्र. १ मधून विजयी झाल्या. त्या राष्ट्रवादीचे नेते दीपक माळी यांच्या गटामधून विजयी झाल्या आहेत.
पोखरापूर येथील शिक्षक सुधाकर खंदारे यांची पत्नी श्यामल खंदारे यापूर्वी दोन वेळा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या होत्या. मात्र, यावेळी निवडून यायचेच, या इराद्याने उभ्या राहिल्या आणि प्रभाग क्र. ३ मधून निवडून आल्या. त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असून, शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या संदीप दळवे, हर्षद दळवे, श्रीधर उन्हाळे, शिवाजी दळवे, पं.स. सदस्या सिंधू वाघमारे यांच्या गटातून त्या प्रथमच विजयी झाल्या.
सय्यद वरवडे येथील शिक्षक नामदेव कुचेकर यांची पत्नी महानंदा कुचेकर या प्रथमच गावच्या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या व प्रभाग १ मधून निवडून आल्या. त्यांचे शिक्षण १० वी झाले असून, बाळराजे राजन पाटील ग्रामविकास पॅनलमधून त्या उभ्या होत्या.
या सेवेत असणाऱ्या तीन जि.प. शिक्षकांच्या सोबतच सेवानिवृत्त शिक्षकदेखील या निवडणुकीत सक्रिय होते. वरकुटे येथील जि.प.चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिदास बंडगर यांची पत्नी राजश्री बंडगर या देखील निवडून आल्या आहेत.
काही गावांमधून जि.प. शिक्षकांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे.
----