कुत्र्याच्या हल्ल्यातून कोकराला वाचवताना शेततळ्यात पडून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:16 AM2021-06-28T04:16:44+5:302021-06-28T04:16:44+5:30
सांगोला : मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलेल्या शेळीच्या कोकराला वाचवताना भोळसर महिला शेततळ्यात बुडून मरण पावली. विद्याताई संजय जाधव ...
सांगोला : मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलेल्या शेळीच्या कोकराला वाचवताना भोळसर महिला शेततळ्यात बुडून मरण पावली.
विद्याताई संजय जाधव (वय ३६) असे मृत महिलेचे नाव असून २० जून रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास सोमेवाडी (ता. सांगोला) येथील जाधव वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली.
संजय राजाराम जाधव व विद्याताई संजय जाधव हे जोडपे जनावरे व शेळ्या चारून गुजराण करतात. २० जून रोजी शेळ्या चारत हाेते. इतक्यात मोकाट कुत्र्यांनी शेळ्यांसह तिच्या कोकरांवर हल्ला चढवला. यावेळी गोंधळ उडाला. यावेळी संजय जाधव घाईघाईत जनावरे व शेळ्या घराकडे घेऊन निघाले तर विद्याताई जाधव या कुत्र्यांच्या हल्ल्यातून लहान पिल्लाला वाचवत होत्या. त्यावेळी कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. दरम्यान पत्नी पाठीमागून येईल म्हणून संजय जाधव तिची घरी वाट पाहत होते. परंतु ती घराकडे परतली नाही. म्हणून त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले. तेथे शेळीचे जखमी पिल्लू आढळले. परंतु पत्नी दिसून आली नाही. मात्र शेततळ्याशेजारी तिची चप्पल दिसून आल्यामुळे त्यांचा संशय बळावला.
त्यांनी ही घटना भावकीतील लोकांना सांगून पत्नीचा परिसरात शोध घेतला, पण सापडली नाही. अखेर भावकीतील लोकांनी तिचा त्या शेततळ्यातील पाण्यात शोध घेत असताना खोलवर बुडालेल्या अवस्थेत पत्नीचा मृतदेह मिळून आला.
---
मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त कोण करणार?
वनविभाग व ग्रामपंचायतीला कळवूनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता आला नाही. त्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे शेततळ्यात बुडून माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. प्रशासनाने आता तरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संजय जाधव यांनी केली आहे.
--
२७ विद्या जाधव