साडीचा पदर ट्रॅक्टरच्या ब्लोअर राॅडमध्ये अडकून डाळिंब झाडांना स्लरी सोडणाऱ्या महिलेचा मृत्यू
By काशिनाथ वाघमारे | Published: August 13, 2023 08:51 PM2023-08-13T20:51:31+5:302023-08-13T20:51:42+5:30
याबाबत पती प्रवीण तातोबा येलपले यांनी पोलिसात खबर दिली आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूने अजनाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर: डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडताना ब्लोअरच्या राॅडमध्ये साडीचा पदर अडकून गळफास बसल्याने पत्नीचा पतीदेखत मृत्यू झाला.
प्रियांका प्रवीण येलपले (२९़, रा. अजनाळे, ता. सांगोला) असे मृत महिलेचे नाव असून रविवार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अजनाळे येथे ही घटना घडली.
याबाबत पती प्रवीण तातोबा येलपले यांनी पोलिसात खबर दिली आहे. तिच्या दुर्दैवी मृत्यूने अजनाळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पती प्रवीण येलपले व पत्नी प्रियांका हे दोघे मिळून रविवारी शेतातील डाळिंब बागेत आले. ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या सहाय्याने डाळिंबाच्या झाडाला स्लरी सोडत होते. दरम्यान प्रवीण येलपले पुढे बघून ट्रॅक्टर चालवीत होते.
पत्नी प्रियंका ट्रॅक्टरला जोडलेल्या ब्लोअर युनिटच्या सहाय्याने झाडांना स्लरी ओतत होत्या. इतक्यात ब्लोअर ढवळणी राॅडला प्रियांकाच्या साडीचा पदर गुंडाळून तिला गळफास लागला आणि ट्रॅक्टर जाम चालू लागला. इतक्यात प्रवीण याने पाठीमागे वळून पाहिले असता प्रियांकाच्या गळ्याला साडीचा गळफास बसल्याचे दिसून आले. प्रवीणने ट्रॅक्टर थांबवून प्रियंकाच्या गळ्याला बसलेला साडीचा गळफास काढला व उपचाराकरता तिला तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मुत्यू झाल्याचे जाहीर केले.