ऑक्सिजन बेड न मिळाल्याने करमाळ्यात महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:25+5:302021-04-24T04:22:25+5:30
करमाळा तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून दररोज शंभर ते सव्वाशे कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन लेवल ...
करमाळा तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून दररोज शंभर ते सव्वाशे कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यामध्ये ऑक्सिजन लेवल कमी असलेले २० ते २५ रुग्ण आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या करमाळा तालुक्यात खासगी कमलाई हॉस्पिटलमध्ये २५, शहा हॉस्पिटलमध्ये १० व उपजिल्हा रुग्णालयात १० असे अवघे ४५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वच ऑक्सिजन बेड फुल्ल असल्याने व तालुक्याच्या शेजारी असलेल्या बार्शी, अहमदनगर, बारामती, सोलापूर या ठिकाणीही बेड उपलब्ध होत नसल्याने नवे बाधित रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कठीण परस्थितीशी तोंड द्यावे लागत आहे.
----
ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू
शेलगाव क येथील पन्नास वर्षांच्या मुक्ताबाई ढावरे यांना कोराेनावर उपचारासाठी करमाळा शहरात खासगी दवाखान्यात दिवसभर फिरून चौकशी केल्यानंतर कोठेच ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला नाही. शेवटी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, तेथेही ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने उपजिल्हा रुग्णालयाने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे, असे पत्र दिले. पण, सोलापूर येथे नातेवाईकांनी विचारणा केल्यानंतर तेथेही ऑक्सिजन बेड नसल्याचे सांगण्यात आले. अखेर ऑक्सिजन बेडअभावी मुक्ताबाईंचे निधन झाले, अशी माहिती मुक्ताबाईंचे नातेवाईक बबनराव आरणे यांनी डोळ्यात पाणी आणून दिली.
२३मुक्ताबाई ढावरे