नारी गावास पावसाने झोडपले !
By admin | Published: May 7, 2014 08:35 PM2014-05-07T20:35:32+5:302014-05-09T00:22:50+5:30
घरावरील पत्रे उडाले, बागा उन्मळून नुकसान
घरावरील पत्रे उडाले, बागा उन्मळून नुकसान
बार्शी : तालुक्यात पुन्हा आज दुपारी वादळी पावसाने झोडपले असून, त्यात नारी येथे जोराचे वादळ व पाऊस होऊन गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे तर लिंबू व केळीची झाडे उन्मळून पडल्याने शिवाय गावाबाहेर लावलेल्या कडब्याच्या गंजीवरील पेंड्या उडून नुकसान झाले आहे.
आज दुपारपर्यंत कडक ऊन पडले होते परंतु दुपारनंतर अचानक ढग जमून दुपारी तीनच्या सुमारास अर्धा तास वादळी पाऊस पडला. यामध्ये अनेक शेतकर्यांनी शेतात निघालेला कडबा त्याच्या गंजी लावून ठेवलेल्या होत्या त्यातील अनेकांच्या पेंढ्या काही अंतरावर जाऊन पडल्या.
गावातील चंद्रकांत माळी यांचे पूर्ण पत्र्याचे शेड तर रंगनाथ कदम, बाळासाहेब बारंगुळे यांच्यासह अनेकाच्या घरावरील तर गावातील मातंग समाजासाठी असलेल्या चावडीवरील पत्रे या वादळी पावसातील वार्यामुळे उडून गेले आहेत. तर या गावातील शेतकरी शहाजी गोपीनाथ कदम यांच्या दोन एकर लिंबूच्या बागेतील काही झाडे व विनायक दिगांबर कदम, विनायक शिंदे यांच्या केळीच्या बागेतील काही झाडे उन्मळून पडली तर या वादळी पावसातच बलभीम रामा बिरंगे यांच्या द्राक्षाच्या बागेजवळील झाडे उन्मळून बागेच्या मांडवावर पडून काही फाउंडेशन भुईसपाट होऊन अतोनात नुकसान झाले आहे.