महिलेच्या सतर्कतेने चांदीचा मुखवटा बचावला; चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:37+5:302021-05-29T04:17:37+5:30
आहेरवाडीच्या श्री शावरसिद्ध मंदिराचे दार तोडून देवाचा एकावन्न तोळे चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ...
आहेरवाडीच्या श्री शावरसिद्ध मंदिराचे दार तोडून देवाचा एकावन्न तोळे चांदीचा मुखवटा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मंदिराशेजारी राहणाऱ्या महिलेने दोन दिवस मंदिराभोवती घिरट्या मारणाऱ्या तळीरामाला पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. जवळच वीटभट्टीमध्ये काम करणारा रमेश आप्पासाहेब लोहार (वय ४१, रा. नजीक चिंचोली, ता. अक्कलकोट) या संशयिताला माहितीवरून वळसंग पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबूल केला.
कबुलीजबाबात संशयित आरोपी रमेश लोहार याने आपणच मुखवटा मंदिरातून काढला; पण समोरच्या महिलेचे लक्ष माझ्याकडे असल्याने जवळच्या दगडाखाली लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन हा मुखवटा ताब्यात घेतला. अप्पाशा शावराप्पा वाघमारे (रा. आहेरवाडी) यांच्या फिर्यादीवरून रमेश लोहार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजकुमार गुरव अधिक तपास करीत आहेत.
----