मालवंडीत सशस्त्र दरोडा टाकून महिलांना मारहाण; शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन दागिने पळविले
By काशिनाथ वाघमारे | Published: January 2, 2024 07:23 PM2024-01-02T19:23:40+5:302024-01-02T19:24:02+5:30
जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने मालवंडीत एकच खळबळ उडाली.
सोलापूर : मालवंडी (ता. बार्शी) येथे शेतातील एका वस्तीवर दोन शेतकऱ्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून महिलांना जबर मारहाण करीत १ लाख ४० हजारांचे दागिने लुटले तर शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटात चाकू मारुन रोख साडेचार हजार लांबवल्याची घटना घडली. जखमींना बार्शीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने मालवंडीत एकच खळबळ उडाली.
याबाबत गणेश बाळासाहेब होनराव (वय ३०, रा.मालवंडी) यांनी बार्शी तालुका पोलीसात फिर्याद दिली असून हा दरोडा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसी अथार्त १ जानेवारी २०२४ रोजी रात्री १ च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी होनराव हे १ जानेवारी रोजी अक्कलकोट येथे देवदर्शनास गेले होते. रात्री १२ वाजता परतल्यानंतर घराबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये गणेश झोपले तर महिला घरात झोपी गेल्या. काही वेळेत चौघेजण हातात कटावणी, चाकू घेऊन आले. त्यावेळी गणेश ओरडले अन चाकुचा धाक दाखवून एकजण थांबला. इतर साथिदार घरात घुसून झोपलेल्या महिलेस मारहाण करून अंगावरील दागिने काढून घेतले. कपाटातील लग्नाचे दागिने व रोख रक्कमही घेतली. जाताना बाहेरून कडी लावली. यापैकी काही चोरट्यांनी शिट्टी वाजवून इतर साथिदारांना सावध केले.
त्यानंतर त्यांनी काही अंतरावर हनुमंत हरिभाऊ सरवदे या शेतक-याच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांनी बंद घराची कडी लोहचुंबक काढली. त्यावेळी सरवदे जागे झाले आणि विरोध करताच त्यांच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्याजवळील रोख ४५०० रुपये घेऊन पळाले. जखमींना २ जानेवारी रोजी नातेवाईकांनी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करताच पोटातील आतड्यास जबर मार लागल्याचे निदर्शनास आले. डॉ.सावंत यांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तपास पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करत आहेत.
रोकडसह दागिन्यांवर डल्ला
या दरोड्यात फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र, सोन्याचे ७ ग्राम गंठण, ७ ग्रॅम कर्णफुले, २ ग्रॅम कर्णफुले व पिळ्याच्या आंगठ्या, पैंजण व रोख २० हजार ५०० रुपये घेऊन चोरटे पसार झाले. तसेच फिर्यादीच्या घरा शेजारील जखमीचे ४ हजार ५०० रुपये लांबविले.