बार्शीतील महिला पोलिसाने चुकविले शस्त्राचे वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:18 AM2021-01-09T04:18:19+5:302021-01-09T04:18:19+5:30
बार्शी : येथील उपविभागीय कार्यालयातील महिला पोलीस शिपाईला चौघांनी मारहाण करून धारदार शस्त्राने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. हे ...
बार्शी : येथील उपविभागीय कार्यालयातील महिला पोलीस शिपाईला चौघांनी मारहाण करून धारदार शस्त्राने हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. हे वार चुकवीत त्यांनी स्वत:ला वाचविले. यापूर्वी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरून हा हल्ला चढविण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रेश्मा सुतार (वय ३०, रा. साकत पिंपरी, ता. बार्शी) असे जखमी महिला पोलीस शिपायाचे नाव असून, त्या उपविभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान तुळजापूर रोडवर शेलगावपासून तीन किलो मीटर अंतरावर हा प्रकार घडला.
उपविभागीय कार्यालयातील काम सपंवून त्या स्वत:च्या मोपेड वाहनावरून साकत पिंपरीकडे निघाल्या होत्या. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी थांबवून लाथ मारून गाडीवरून खाली पाडले. मेहुण्यांवर गुन्हा दाखल करतेस काय म्हणत त्या अनोळखी चौघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला आणि तो त्यांनी परतवून लावला. दुसऱ्यांदा डोकीवर होणारा वारही चुकविला. इतक्यात त्या पतीशी आणि पोलिसांशी फोनवरून संपर्क साधला. संबंधित पोलीस घटनास्थळी धाव घेत जखमी महिला पोलिसाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.
---
वैरागमध्ये दाखल केला होता गुन्हा
यापूर्वी रेश्मा सुतार या वैराग पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. दरम्यान, त्यांनी उमेश डोळस यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या त्या बार्शी उपविभागीय कार्यालयात सेवा बजावीत आहेत. हल्लेखोरांनी मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करतेस काय, असा दम देत शस्त्राने हल्ला चढविला. गाडीखाली पाय अडकल्याने त्यांना उठून धावता आले नाही. आज तू घरी कशी जाते हे बघतोच... तुला जिवे ठार मारतो, जिवंत सोडणार नाही असे म्हणून ते बार्शीच्या दिशेने निघून गेले.