वळसंगच्या महिला सरपंच, ग्रामसेवकांसह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:14+5:302021-06-25T04:17:14+5:30
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगच्या सरपंच महानंदा दुधगी, त्यांचे पती श्रीशैल दुधगी आणि ग्रामविकास अधिकारी दस्तगीर ...
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगच्या सरपंच महानंदा दुधगी, त्यांचे पती श्रीशैल दुधगी आणि ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ या तिघांनी फिर्यादी शांतकुमार नामदेव गायकवाड (वय ३२, रा. वळसंग) यांना जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे.
नामदेव गायकवाड हे वळसंग ग्रामपंचायत येथून सफाई कामगार म्हणून जून २०२०मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा फिर्यादी शांतकुमार गायकवाड सुद्धा वडिलांसोबत सफाई कामगाराचे काम करत होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मुलगा शांतकुमार यांना कामावर घेतो असे आश्वासन देण्यात आले, मात्र तसे घडले नाही. कायम नियुक्ती द्या, असे शांतकुमार यांनी तगादा लावला होता. त्यानंतर ३ जून रोजी सरपंच महानंदा दुधगी त्यांचे पती माजी सरपंच श्रीशैल दुधगी, ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ ग्रामपंचायत कार्यालयात होते. प्रशासनास मागणी केली असता कायम करू, असे सतत आश्वासन देण्यात आले. पण जून महिन्यात सरपंच महानंदा दुधगी त्यांचे पती श्रीशैल दुधगी व ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ यांनी शांतकुमार यांना कामावर येऊ नकोस, असे आदेश दिले.
३ जून २०२१ रोजी शांतकुमार हे वळसंग ग्रामपंचायत कार्यालयात गेले त्यावेळेस सरपंच महानंदा दुधगी त्यांचे पती श्रीशैल दुधगी व ग्रामविकास अधिकारी दस्तगीर नदाफ हे उपस्थित होते. शांतकुमार यांनी वरील तिघांना वडिलांच्या जागेवर कायमस्वरूपी कामावर घ्या, असे विनंती केली असता त्यांना जातीवाचक शब्दांत अपमानित करण्यात आले. तिघे शांतकुमारच्या अंगावर येऊन जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद शांतकुमार गायकवाड यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिली. वळसंग पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड हे करीत आहेत.