Shivaji Jayanti 2020; सोलापुरातील महिला घेताहेत शिवकालीन मर्दानी खेळाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:17 AM2020-02-11T10:17:05+5:302020-02-11T10:20:16+5:30
संभाजी आरमारचा उपक्रम : विराट रॅलीसह महिलांची पालखी पदयात्रा, दोन गटात छायाचित्र स्पर्धेचेही आयोजन
सोलापूर : महिलांवरील वाढते हल्ले अन् अत्याचार महिलाच रोखतील, हा उद्देश ठेवून यंदा संभाजी आरमारच्या महिला आघाडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १७ फेब्रुवारीपासून दररोज सायंंकाळी ५ ते ७ पर्यंत जुळे सोलापुरातील कृष्णा कॉलनीतील मारुती मंदिराच्या पटांगणात महिलांना शिवकालीन मर्दानी खेळाचे धडे देण्यात येणार असल्याचे आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे यांनी सांगितले. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता शिवछत्रपती रंगभवन येथून विराट रॅलीसह महिलांची पालखी पदयात्राही निघणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाची भाषा होत असताना दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटना महिलांनाच रोखता आल्या पाहिजेत़ यासाठी शिवछत्रपतींचे शौर्य, पराक्रमाचे संस्कार त्यांच्यात बिंबवण्यासाठी आरमारच्या महिला आघाडीने शिवकालीन मर्दानी खेळाचे धडे देण्याचा अनोखा उपक्रम यंदा हाती घेतला आहे.
मर्दानी खेळाचे धडे देण्यासाठी ५ फेब्रुवारीपासून महिलांना खास प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे शहरप्रमुख उमा रजपूत, उपप्रमुख ज्ञानेश्वरी गायकवाड आणि शहर सचिव कविता मराळ यांनी सांगितले.
शिवजयंती कालावधीत (१ ते १९ फेब्रुवारी) जयंती उत्सवाबाबतच्या अनेक घटना, प्रसंगांचे छायाचित्रण करणाºयांसाठी कॅमेरा अन् मोबाईल कॅमेरा या दोन गटात फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली आहे. दोन्ही गटातून प्रत्येकी तीन बक्षिसे देण्यात येणार आहेत़ काढलेले फोटो ई-मेल आयडीवर पाठवून द्यावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, शहरप्रमुख शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
आरमारच्या शिवरॅली प्रमुखपदी छत्रबंद
- संभाजी आरमारच्या वतीने यंदा शिवजयंतीनिमित्त हटके उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिवाय विराट रॅलीसह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या शिवरॅलीच्या अध्यक्षपदी अनिल छत्रबंद यांची निवड करण्यात आल्याचे श्रीकांत डांगे यांनी बैठकीत जाहीर केले. यावेळी शिवाजी वाघमोडे, प्रा. सर्जेराव पाटील, अॅड. महेश जगताप, अॅड. बाबासाहेब जाधव, तुकाराम जाधव, प्रकाश डांगे, गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, अनंतराव नीळ, संजय सरवदे, उमा रजपूत, ज्ञानेश्वरी गायकवाड, कविता मराळ, वर्षा तोरवी, अमर गुंड, सोमनाथ मस्के आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यात संभाजी आरमारचे तीन हजार मावळे टी-शर्ट परिधान करुन सहभागी होणार आहेत.
शिवछत्रपतींचे विचार अन् त्यांचे संस्कार युवा पिढीने घ्यावेत, यासाठी यंदाच्या शिवजयंतीनिमित्त अनोखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत़ स्त्री रक्षणाचा विचार करुन यंदा महिलांना शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत भरकटलेल्या युवक-युवतींना योग्य दिशा दाखविण्याचे काम संभाजी आरमारच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शिवछत्रपतींना हेच खरे अभिवादन असणार आहे.
-श्रीकांत डांगे,
संस्थापक- संभाजी आरमार.