पुरुषांच्या बरोबरीनंच केलं महिलांनीही मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:09+5:302021-01-17T04:20:09+5:30
बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत नारी येथील अपवाद वगळता शांततेत व चुरशीने ८१.६९ टक्के मतदान झाले. तालुक्यात सर्वाधिक ९३.४३ टक्के ...
बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत नारी येथील अपवाद वगळता शांततेत व चुरशीने ८१.६९ टक्के मतदान झाले. तालुक्यात सर्वाधिक ९३.४३ टक्के मतदान हे इंदापूर, कळंबवाडी पा. या गावातील एका प्रभागात झाले तर भानसळे येथे सर्वात कमी ५८.१० टक्के मतदान झाले़ तालुक्यात ७८ गावातील २३८ प्रभागातील ६०३ सदस्यांसाठी हे मतदान झाले़ धसपिंपळगाव, श्रीपतपिंपरी यासह बऱ्याच गावात नात्यागोत्यात लढती झाल्या़. ४० वर्षांनंतर ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या मळेगावातील तीन प्रभागात मिळून १९५६ (८२.८१) टक्के मतदान झाले. गावोगावी अतिशय चुरशीने मतदान झाले.
ग्रामपंचायतीसाठी आले बाहेरगावचे मतदार
गावोगावी जवळपास पाच टक्के मतदार हे बाहेरबावी आहेत. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत हे मतदार मतदान करण्यासाठी गावाकडे येत नाहीत. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय चुरशीने लढवली जात असल्यामुळे हा सर्व मतदार मतदानासाठी गावाकडे आल्याचे दिसून आले़. या मतदारांच्या येण्या-जाण्याचा खर्च मात्र दोन्ही गटांंनी केल्याचे दिसून आले़. कारण प्रत्येक गट अशा मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होता.
विकासापेक्षा वैयक्तिक संपर्कावर झाले मतदान
या निवडणुकीमध्ये विकास हा मुद्दा असला तरी तो नावालाच होता. कारण या निवडणुका विकासाच्या मुद्द्यापेक्षा व्यक्तिगत कामे, त्यांचा असलेला संपर्क, भावकी, पाहुणे-रावळे, एकमेकांना केलेली मदत या मुद्द्यांवरच लढवल्या गेल्या़. तसेच मागील वेळेस अमूक याने माझ्या चुलत्याला मदत केली नव्हती. त्यामुळे मी त्याला मतदान करणार नाही, अशा किरकोळ विषयावरून मतदानात चुरस दिसून आली.