आत्महत्येचा विचार करणाºया महिलांनी घेतला जीवन जगण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 03:00 PM2019-09-10T15:00:43+5:302019-09-10T15:02:44+5:30

आत्महत्या प्रतिबंधक दिन; तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात ओंकार समुपदेशन केंद्रामार्फत केले जाते मार्गदर्शन

Women who consider suicide decided to make a living | आत्महत्येचा विचार करणाºया महिलांनी घेतला जीवन जगण्याचा निर्णय

आत्महत्येचा विचार करणाºया महिलांनी घेतला जीवन जगण्याचा निर्णय

Next
ठळक मुद्देदुर्दैवाने निराधार झालेल्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजातील लोकांनी चांगला ठेवला पाहिजे चुकीची आहे की बरोबर याकडे न पाहता तिला मानसिक बळ दिल्यास तिला जगण्याची उमेद निर्माण होईलआपल्या घरातील आई, बहीण असल्यासारखी वागणूक दिल्यास प्रत्येक महिलेमध्ये धैर्य येईल आणि आत्महत्या होणार नाहीत

सोलापूर : ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे जीवन निरर्थक व नीरस वाटते तेव्हा नैसर्गिकरित्या त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. अशा वेळी जर त्याला योग्य असे मानसिक पाठबळ मिळाले नाही तर तो स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न करतो. अशाच मानसिकतेमध्ये असलेल्या दोन विवाहित महिलांनी ओंकार समुपदेशन केंद्राच्या वतीने केलेल्या मार्गदर्शनामुळे जीवन जगण्याचा निर्णय घेतला. 

महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार आणि त्यातून निर्माण होणारी आत्महत्या करण्याची मानसिकता याला प्रतिबंध करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात ओंकार समुपदेशन केंद्र चालविले जाते. शिवसेनेच्या जिल्हा महिलाप्रमुख अस्मिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दोन समुपदेशक महिला केंद्राचे काम पाहतात. सोनाली (बदललेले नाव) नावाची एक महिला एका राजकीय नेत्याच्या स्वीयसहायकाची पत्नी आहे. सोनालीला ११ वर्षांचे मुल आहे, मात्र पतीला सोनाली नको होती, तिला घराबाहेर काढण्यासाठी त्याने शक्कल लढवली. एका अनाथ आश्रमात तुला कायमची नोकरी लावतो, तेथेच राहायची व्यवस्था आहे. मी अधूनमधून येत जाईन, असे सांगितले. नोकरी लागल्यानंतर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल, मुलाच्या भवितव्याची चिंता मिटेल असे सांगून पतीने पत्नी सोनाली हिला कामाला लावले. चांगल्या पदाची नोकरी आहे असे सांगून प्रत्यक्षात साफसफाई करण्याचे काम लावले. काही दिवसांनंतर संबंधित महिलेस आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी व तेथील कर्मचाºयांनी त्रास देण्यास सुरूवात केली.

सोनाली व तिच्या मुलास मारहाण केली जात होती. असहाय झालेल्या सोनालीने पोलिसांत धाव घेतली. संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. न्याय लवकर मिळत नव्हता, पतीने पत्नीला कामाला लावून सोडून दिले होते. आता करायचे काय? असहाय झालेल्या महिलेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार ओंकार समुपदेशन केंद्राला समजला, त्यांनी महिलेची भेट घेतली. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, तिला आर्थिक मदत केली आणि रोजगार मिळवून दिला. मानसिक पाठबळ मिळाल्यामुळे महिलेने जगण्याचा निर्णय घेतला. सोनाली ही सध्या न्यायालयीन लढाई लढत आहे.

उच्चशिक्षित घरातील विवाहिता देत आहेत लढा...
- उच्चशिक्षित घराण्यातील इंजिनिअर मुलाशी एका सुंदर मुलीचा विवाह झाला. कालांतराने दोघा पती-पत्नीमध्ये वाद होत होता. दोघांच्या वादामुळे सासू-सासºयाने सुनेला घरातून बाहेर काढण्यासाठी न्यायालयात खटला दाखल केला. माहेर सोडून सासरी असलेल्या पत्नीला नाहक छळाचा सामना करावा लागत होता. न्यायालयीन लढा देताना कंटाळलेल्या विवाहितेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. महिलेस ओंकार समुपदेशन केंद्रात जाण्याचा सल्ला देण्यात आला. केंद्रात महिलेला प्रथमत: मानसिक बळ देण्यात आले. पतीच्या जागेतच तिला एक रूम मिळवून देण्यात आली. पोटगीचा खटला सुरू असून, ती आज धाडसाने न्यायालयीन लढाई लढत आहे. महिलेने आत्महत्येचा निर्णय बदलला. 

दुर्दैवाने निराधार झालेल्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजातील लोकांनी चांगला ठेवला पाहिजे. स्त्री चुकीची आहे की बरोबर याकडे न पाहता तिला मानसिक बळ दिल्यास तिला जगण्याची उमेद निर्माण होईल. आपल्या घरातील आई, बहीण असल्यासारखी वागणूक दिल्यास प्रत्येक महिलेमध्ये धैर्य येईल आणि आत्महत्या होणार नाहीत. 
-अस्मिता गायकवाड, शिवसेना जिल्हा महिलाप्रमुख

Web Title: Women who consider suicide decided to make a living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.