सोलापुरातील विडी उद्योगाला कंटाळलेल्या महिला वळल्या गारमेंट उद्योगाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:51 PM2021-06-25T16:51:14+5:302021-06-25T16:51:23+5:30
आठ हजार महिलांना मिळाला नव्याने रोजगार -
सोलापूर : धूम्रपान कायद्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विडी उद्योग अडचणीत सापडला आहे. विडी उद्योग बंद पडणार.. बंद पडणार अशा चर्चा अनेकदा होत असल्यामुळे काही महिला कामगार विडी उद्योग सोडून गारमेंट उद्योगकडे वळताहेत. मागील चार-पाच वर्षांत गारमेंट उद्योगात हेल्पर तसेच शिलाई कामगार म्हणून महिला काम करतायेत. सोलापुरात सात ते आठ हजार महिला कामगार गारमेंट उद्योगात कार्यरत असल्याची माहिती आहे.
विडी उद्योग वाचवण्याकरिता माजी आमदार नरसय्या आडम यांनी हजारो महिला कामगारांना एकत्रित करून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यामुळे पुन्हा एकदा विडी उद्योगातील संकटांची चर्चा सुरू झाली आहे. विडी उद्योगातील संकटासंदर्भात यापूर्वी अनेकदा मोर्चा, आंदोलने झालीत. सध्या हा न संपणारा विषय बनला असून उद्योगातील अडचणींना कंटाळून काही महिला कामगार या उद्योगातून बाहेर पडताहेत. सध्या विडी उद्योगात ५० हजार महिला काम करत आहेत. ही संख्या पूर्वी ६० ते ७० हजारांत होती.
विडी उद्योग वाचविण्याकरिता आता ज्या पद्धतीने आंदोलने होत आहेत, त्याच धर्तीवर विडी उद्योगातील महिलांच्या शोषणाविरोधात अनेक कामगार संघटनांनी यापूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत. छाट विड्यांचा प्रश्न असो पान-तंबाखू कमी देणे यासह इतर कामगारांच्या अनेक प्रश्नांवर उद्योगाविरोधात कामगार संघटनांनी व्यापकरित्या आंदोलन केले.
विडी कारखान्यात नवीन भरती बंद...
विडी कारखान्यांचे कार्ड मिळवण्याकरिता पूर्वी महिला धडपड करायच्या. कारखान्यांसमोर रांगा लावायच्या. आता ती परिस्थिती राहिली नाही. कारखानदारांकडून नवीन कार्ड वाटप बंद आहे. कारखानदारांनी नवीन भरती अनेक वर्षांपासून थांबविली आहेत. त्यामुळे युवती विडी उद्योगात न येता गारमेंटकडे जात आहेत.
या कारणामुळे महिला वळल्या गारमेंटकडे
गारमेंट पूर्वी काही महिला टेक्सटाईल उद्योगात काम करायच्या. टेक्स्टाईल उद्योगाची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. त्यामुळे तेथेही महिलांना समाधानकारक मजुरी मिळेना. मागील चार-पाच वर्षांत गारमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात बहरत आहे. वाढत आहे. गारमेंट उद्योगात अपेक्षित मजुरी मिळत असल्याने पूर्वभागातील बहुतांश महिला गारमेंट उद्योगात ऑफिस वर्कर, हेल्पर तसेच शिलाई कामगार म्हणून रूजू होत आहेत तसेच काही कारखानदारांकडून महिलांना पीएफ तसेच विमा संरक्षणही दिले जात आहे.
महिलांना गारमेंटचे प्रशिक्षण
गारमेंट उद्योगात जास्तीत जास्त महिला यावेत, याकरिता सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्यावतीने महिलांना गारमेंटचे प्रशिक्षण दिले गेले. जवळपास आठशे महिला या प्रशिक्षणाचा फायदा घेतला. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना महिनाभर मोफत प्रशिक्षण दिले. त्यांना पंधराशे रुपयांचे मानधनही दिले. शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशिक्षण शिबिर पुढे सुरू राहिले नाही.