Women's Day Special : भल्या पहाटे वर्तमानपत्र वाटून ‘ती’ घडवितेय स्वत:चं भविष्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:09 AM2019-03-08T11:09:24+5:302019-03-08T11:11:05+5:30
गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : शहर पहाटेच्या साखरझोपेत असते तेव्हा ‘तिच्या’ दिवसाला सुरुवात होते. भल्या पहाटे चार वाजता सायकल दामटत ...
गोपालकृष्ण मांडवकर
सोलापूर : शहर पहाटेच्या साखरझोपेत असते तेव्हा ‘तिच्या’ दिवसाला सुरुवात होते. भल्या पहाटे चार वाजता सायकल दामटत ‘ती’ सोलापूरच्या आसरा चौकातील पेपर स्टॉलवर जाते. मुख्य एजंटाकडून दैनिकांचे अंक घेऊन स्टॉल मांडते. पहाटे फिरायला येणाºया ग्राहकांना स्टॉलवरून पेपर देते. साडेचार वाजता ती लाईनवर पेपर टाकायला निघते. शहरातील अंधारलेल्या गल्लीबोळातून बिनधास्त सायकल चालवत ती दारोदार अंक टाकत राहते. तिच्या या कामाचे कौतुक पाहण्यासाठी सूर्य रोज डोंगराआडून हळूच उगवतो; त्याच्या उगवण्यासोबत अंधार भेदतो अन् त्याच्या पहाटकिरणांनी ती वर्तमानपत्र वाटून घडवितेय स्वत:चे भविष्य !
सुश्मिता सटवाजी गायकवाड असे तिचे नाव. वय २४ वर्षे. शिक्षण एम.ए. मानसशास्त्र अंतिम वर्ष. सहसा या वयात कुणी तरुणी पहाटेच्या अंधारात एकटीच सायकलवरून फिरून पेपर लाईन टाकण्याचे काम करीत नाही, मात्र सुश्मिता अपवाद आहे. मागील १३ वर्षांपासून ती हे काम करते. सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात शिकणाºया या धाडसी तरुणीशी संवाद साधला तेव्हा तिच्यातील जिद्दीचे दर्शन झाले. महिलांच्या दृष्टीने हे क्षेत्र तसे आडवळणाचेच, मात्र ती या क्षेत्राकडे वळण्यामागे आजोबांवरील प्रेमाची भावना आहे. तिच्या आजोबांना पेपर वाचनाची भारीच हौस. ते वारल्यावर वडील सटवाजी गायकवाड यांनी वडिलांच्या आठवणीखातर एखाद्या वृद्ध वाचकाला आपल्याकडून एक वृत्तपत्र देण्याची कल्पना मांडली.
त्यावर सुश्मिता आणि तिच्या भावंडांनी अशी व्यक्ती स्वत:च शोधण्याची जबाबदारी घेतली. त्यातून वडिलांनी आसरा चौकातील बस शेडच्या एका कोपºयात मुलांसाठी पेपर स्टॉल सुरू करून दिला. पहिल्या दिवशी सकाळी २० अंक त्यांनी विक्रीसाठी ठेवले. दुपारी १२ वाजेपर्यंत वाट पाहिल्यावर मोजून सहा अंक विक्रीस गेले, तरीही पहिल्या दिवसाच्या विक्रीचा आनंद अवर्णनीय होता. आज ती दररोज एक हजारांच्या जवळपास अंक विकते. २०० अंकांची लाईन स्वत: टाकते. सकाळी ७ वाजेपर्यंत वाटपाचे काम झाले की स्टॉलवर बसून हिशेब करते. येणाºया ग्राहकांना अंक देते. सकाळी ११ वाजेपर्यंत हा स्टॉल सांभाळून घरी जाते. कॉलेजची कामे करते, पुन्हा दुपारी साडेतीन वाजल्यानंतर सवडीप्रमाणे स्टॉलवर येऊन राहिलेले काम पूर्ण करते.
तिच्या या कामाचा मित्र आणि नातेवाईकांना अभिमान आहे. एक कर्तृत्ववान तरुणी म्हणून तिच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. मैत्रिणींमध्येही तिच्या कामाचा आदर आहे. या कामात तिला कधीच स्त्रीत्व आड आले नाही. क्षेत्र लहान असो की मोठे, त्यातून स्वत:ला कसे घडवायचे हे एकदा उमगले की सर्व वाटा सुलभ होतात, असा तिचा स्वानुभव आहे.
व्यवसायाने दिशा दिली
हा व्यवसाय कधी अडचणीचा वाटला नाही का, या प्रश्नावर तिचे उत्तर साफ नकारार्थी आहे. या व्यवसायाने आपल्यासह बहिणीच्या आणि भावाच्या आयुष्याला दिशा दिली, असे तिचे मत आहे. तिची मोठी बहीण पुण्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला आहे. तिथे जाण्यापूर्वी ती सुद्धा पेपर स्टॉल चालवायची. लहान भाऊ अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. सकाळी तो सुद्धा स्टॉलवर मदत करतो. ती स्वत: मानसशास्त्राची विद्यार्थिनी असून, भविष्यात तिला याच विषयात पीएच.डी. करून सरकारी नोकरी करायची आहे.
नोडो नोडो हुली बत्तू...
सुश्मिताच्या आयुष्यातील एक प्रसंग तिच्या कर्तृत्वाला शाबासकी देणारा अन् आठवणीत राहील असाच आहे. पहाटे लाईनवर अंक वाटताना अनेक जण झोपेतच असतात. मात्र एक मुलगी अंक वाटते, हे ज्यांना ठाऊक होते त्यांना तिचे भारीच कौतुक! एकदा अशाच सकाळी तिला बघून एक आई आपल्या झोपलेल्या मुलाला म्हणाली, ‘नोडो, नोडो हुली बत्तू... नीनू इना मलकोंडिदी..’ अर्थात, बघ बघ वाघ आलाय.., अन् तू अजूनही झोपूनच आहेस!