Women's Day Special : सोळा वर्षांच्या स्नेहल मोरे महाराजांची कीर्तन भक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:04 PM2019-03-08T12:04:48+5:302019-03-08T12:08:11+5:30
जगन्नाथ हुक्केरी सोलापूर : सांप्रदायिक कुटुंबात जन्म. घरातील सगळेच वारकरी असल्याने आपोआप ते संस्कार होत गेले. कीर्तन किंवा ...
जगन्नाथ हुक्केरी
सोलापूर : सांप्रदायिक कुटुंबात जन्म. घरातील सगळेच वारकरी असल्याने आपोआप ते संस्कार होत गेले. कीर्तन किंवा प्रवचन करणारे कोणीही घरात नसताना कीर्तन करण्याकडे कल वाढला आणि अवघ्या पंधराव्या वर्षी दहावीत शिक्षण घेत असतानाही ह. भ. प. स्नेहल मोरे महाराज जीवनाचे मूळ अन् कुळ कीर्तनातून सांगू लागल्या. आता त्या सोळा वर्षांच्या असून, अकरावीत शिकत आहेत.
बार्शी तालुक्यातील साकत हे त्यांचे मूळ गाव. प्राथमिक शिक्षणाचे धडे वैराग येथील अर्णव माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत घेतले. सध्या त्या अर्णव प्रशालेत कला शाखेत अकरावीमध्ये शिकत आहेत. वडील दत्तात्रय मोरे बांधकाम व्यावसायिक तर आई घरकामातच व्यस्त. अभ्यासाबरोबरच कीर्तनाचे धडे त्यांनी स्वत:हून आत्मसात केले. त्याला तसं कारणही होतं. ह. भ. प. सौरभ महाराज मोरे हे त्यांचे बंधू वयाच्या सातव्या वर्षांपासून मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजीतून कीर्तन करायचे. त्यांना साथसंगत करताना स्नेहल महाराजांना कीर्तन करण्याची कला आत्मसात झाली आणि त्या ‘जन्माचे ते मूळ पाहिले शोधून।। दु:खाशी कारण जन्म घ्यावा।।१।। पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी।। नरदेहा येवुनी हानी केली।।२।।’ असे जीवनाचे तत्त्वज्ञान कीर्तनातून सांगू लागल्या.
वडिलांची आई कोंडाबाई याही वारकरीच. वारकरी परंपरेतील संस्काराने त्या प्रेरित होऊन कीर्तन करू लागल्या. आजपर्यंत त्यांनी पुणे, जळगाव, सातारा, बुलढाणा, बार्शी तालुक्यातील साकत यासह अन्य ठिकाणी ३0-३५ कीर्तन केले आहे. मेमध्ये बाळे, सोलापूर येथे त्यांचे कीर्तन होणार आहे. सर्व संतांचे अभंग त्यांना मुखोद्गत आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगांचा त्यांच्यावर पगडा आहे.
‘जैसी गंगा वाहे तैसें त्याचें मन।। भगवंत जाण तया जवळी।।१।। याबरोबरच ज्याची त्याला पदवी येराला न साजे।। संताला उमजे आत्मसुख।।१।। या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील दृष्टांत देत कीर्तनातून स्नेहल महाराज सांगतात, ‘ आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी।। वाउगी चावटी नका करूं।।२।। लहान वयात त्या संत तुकारामांचा आधार घेत बाबा रे चावटी करू नका, असे ठणकावून सांगतात. ‘अहिनिशीं सदा परमार्थ करावा।। पाय न ठेवावा आडमार्गीं ।।१।।’ अवघ्या सोळाव्या वर्षी आडमार्गी जाऊ नका. जग उद्धारण्यासाठी आपला जन्म झाला आहे. शिस्तीत राहा, मस्तक ताठ ठेवा आणि अन्यायासमोर गुलाम होऊन झुकू नका, हा संदेश त्या कीर्तनातून देत आहेत.
घरात बंधू सौरभ महाराज हे वयाच्या सातव्या वर्षांपासून कीर्तन करीत असल्याने त्यांना प्रेरणा मिळाली. पण स्नेहल महाराजांना त्यांचे वडील दत्तात्रय, आई, आजी भागीरथी खटाळ आणि आजोबा बुवासाहेब खटाळ यांचेही प्रोत्साहन मिळत गेले. यामुळे त्या उत्तमपणे कीर्तन करू लागल्या. अगदी पहिल्या कीर्तनापासूनच त्यांना सभाधीटपणा आल्याचे श्रोते सांगतात.
तबला अन् संगीताचे शिक्षण
- कीर्तन करताना आवश्यक त्या सगळ्या गोष्टी त्यांना आत्मसात आहेत. याशिवाय त्या तबला आणि गायन विशारद आहेत. त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे लातूर येथील अमर कडतणे यांनी दिले तर सध्या त्या पुण्यात रघुनाथ खंडाळकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. कीर्तन हे संतांच्या काळापासून चालत आलेली भक्ती परंपरा आहे. यात समाजाचा उद्धार करण्याची मोठी ताकद आहे. आडमार्गाने म्हणजे वाम मार्गाला लागलेल्यांना बाहेर काढण्याची शक्ती आहे. याच्या माध्यमातून समाजातील अंध रूढी, परंपरा, दांभिकतेचे उच्चाटन करण्याबरोबरच व्यसनमुक्त समाज घडविणे व देशसेवेसाठी चैतन्य निर्माण करण्याचे काम करणार असल्याचे ह. भ. प. स्नेहल महाराज मोरे यांनी सांगितले.