Women's Day Special : ट्रॅक्टरचालकांच्या सावलीसाठी राबतात रुपालीताई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:43 AM2019-03-08T11:43:46+5:302019-03-08T11:45:22+5:30
एल. डी. वाघमोडे माळशिरस : पारंपरिक व्यवसायाचा आधार घेत नव्या संकल्पना घेऊन आधुनिकतेच्या गरजेनुसार विविध वाहनांचे सीट कव्हर्स, स्कूल ...
एल. डी. वाघमोडे
माळशिरस : पारंपरिक व्यवसायाचा आधार घेत नव्या संकल्पना घेऊन आधुनिकतेच्या गरजेनुसार विविध वाहनांचे सीट कव्हर्स, स्कूल बॅगसह वेगवेगळ्या कुशन तयार करणे व विशेष करून ट्रॅक्टरची छत बनविण्यात हातखंडा निर्माण केला तो रूपाली शिंदे यांनी़ पतीसोबत व्यवसायात भरारी घेणाºया रूपाली शिंदे यांनी आतापर्यंत १००० पेक्षा जास्त छत बनविण्याचा टप्पा पूर्ण केलेला आहे. पंचक्रोशीतील हजारो ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टरवर छत मारून सावली करून घेण्यासाठी या माऊलीकडे येतात.
रूपाली शिंदे या धनंजय शिंदे यांच्याबरोबर १४ वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाल्या़ यावेळी धनंजय शिंदे हे तुटपुंज्या पगारावर सहकारी संस्थेत नोकरी करीत होते़ लग्नानंतर दोघांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला़ पाच वर्षांपूर्वी या दाम्पत्याने या व्यवसायाचे कोणतेही प्रशिक्षण नसताना सुरुवात केली़ सुरुवातीला दोघे आॅर्डरप्रमाणे ट्रॅक्टर मालकांच्या घरी जाऊन त्यांना हवे तसा छत तयार करून देत असत़ पुढे पुढे या कामाने गती घेतली़ रोज दोन ते तीन छत बांधले जातात तर ऊसतोडणी हंगामापूर्वी दररोज पाच ते सहा छतांची निर्मिती केली जाते़
छत बांधणीत हातखंडा
- छताला विविध कंपनीचे ४.५० मीटर कापड घेतले जाते़ त्यानंतर छताच्या आकारमानानुसार कापड कापणी करतो़ झुंबर, सिलिंग, लाईटिंग, नक्षीकाम, सोनेरी कलरच्या पट्ट्या व वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीनच्या साह्याने डिझाईन तयार केली जाते़ त्याला चिमट्याच्या साह्याने छताच्या सांगाड्यावर ठेवून विशिष्ट प्रकारच्या सोल्युशनने चिटकावले जाते़ त्याबरोबर आवश्यक त्या ठिकाणी दोरा व आरीच्या साह्याने शिवणकाम केले जाते़ एक छत बनवण्यासाठी तीन तासांचा वेळ लागतोे, असे रूपाली शिंदे सांगत होत्या़
छत बांधणी अथवा अशा पद्धतीची कामे पुरुष मंडळी बºयापैकी करतात, मात्र पतींनी सुरू केलेल्या व्यवसायाला आपला हातभार लागावा, या दृष्टीने मी हा व्यवसाय सुरू केला़ आता सर्व कामे करण्याची कला मी आत्मसात केली आहे. आमच्या तत्पर व मजबूत सेवेमुळे ट्रॅक्टरच्या छत बांधणीला ग्राहक संख्या वाढत आहे़
- रूपाली धनंजय शिंदे, कारागीर