दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले; रणजित डिसलेंनी व्यक्त केली भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:22 AM2020-12-04T11:22:38+5:302020-12-04T11:23:24+5:30
आई व वडिलांनी केला आनंदोत्सव साजरा; हा सन्मान जिल्ह्यातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी
बार्शी/सोलापूर : दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले. हा क्षण म्हणजे आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याची भावना ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी व्यक्त 'लोकमत' शी बोलताना केली.
दरम्यान, रणजित डिसले यांचे वडील महादेव डिसले म्हणाले की, गेल्या दहा वर्षांपासून तो शिक्षण क्षेत्रासाठी चांगल काहीतरी करत आहे हे माहीत होते. नव्हे तर त्याने यासाठी वाहून घेतल्याचे सांगितले. प्रत्येकाला असा मुलगा असावा आम्हाला फारच आनंद झाला. निम्मी रक्कम इतरांना दिली हे त्याने चांगले केले. असे आई पार्वती यांनी सांगितले. हा पुरस्कार सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचेही आई ने सांगितले.
एकाच दिवशी दोन गुड न्युज...
महादेव डिसले हे देखील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक आहेत. या पिता पुत्राने एकाच केंद्रात नोकरी केली आहे. महादेव डिसले यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मोठा मुलगा अमित हा इंजिनिअर असून तो महिंद्रा कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर आहे. योगायोग म्हणजे आजच त्याचे ही प्रमोशन झाले आणि दुसऱ्या मुलाला जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळाला हे अभिमानास्पद असल्याचे महादेव डिसले यांनी सांगितले.