सून असताना मुलगी असल्याचे भासवून मिळवली नोकरी, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार, लाड कमिटी अंतर्गत प्रतिज्ञापत्राचा घेतला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:46 PM2017-12-26T12:46:18+5:302017-12-26T12:47:33+5:30
मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २६ : मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर त्यांची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात शारदा गणेश घंटे या सुनेने नोकरी मिळविल्याची तक्रार अयाज शेख यांनी आयुक्तांकडे केली आहे.
मालन गणेश घंटे या मनपाच्या बॉईस प्रसूतिगृहात सफाई कामगार या पदावर नोकरी करीत होत्या. त्यांचे २ डिसेंबर २००० रोजी निधन झाले. त्यामुळे १० जानेवारी २००१ रोजी त्यांचे नाव मनपा सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर शारदा गणेश घंटे यांनी ६ आॅगस्ट २००१ रोजी लाड कमिटीच्या शिफारशीनुसार मनपात नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालन यांची मुलगी असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक त्या मालन यांच्या सून आहेत. तत्कालीन आयुक्तांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांच्या अर्जाला मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण आरोग्य विभागाकडे पाठविले. त्यावर ११ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची सफाई कामगार म्हणून विभागीय कार्यालय क्र. १ कडे नियुक्ती करण्यात आली. पुन्हा ६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांची बॉईस प्रसूतिगृहाकडे बदली करण्यात आली.
अयाज शेख यांच्या तक्रारीवरून लेखापरीक्षकांनी फेरतपासणी करून ४ आॅक्टोबर २०१७ रोजी अहवाल दिला आहे. त्यात शारदा गणेश घंटे यांचे खरे नाव शारदा उमेश घंटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मालनबाई घंटे यांच्या त्या सूनबाई आहेत. अर्ज सादर करताना त्यांनी १९ जुलै २०१२ रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर प्रतिज्ञापत्र केले आहे. त्यात माझ्या आईच्या ठिकाणी मला सफाई कामगार म्हणून मनपा सेवेत सामावून घ्यावे, असे नमूद केलेले आहे. वास्तविक त्यांच्या आईचे नाव मृदिका अर्जुन वाघमारे, वडिलांचे नाव अर्जुन वाघमारे व शिक्षण आठवी पास आहे. उमेश घंटे यांच्याशी त्यांचे लग्न झालेले असून, उमेश हे मनपाच्या जयभवानी हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शारदा घंटे यांच्या सासूचे नाव मालन व सासºयाचे नाव गणेश घंटे असून, त्यांनी मनपात नोकरी मिळविण्यासाठी सासºयाला पिता भासविलेले आहे.
-------------------
फाईल चौकशीसाठी पडून
याप्रकरणी लेखापरीक्षकांनी स्पष्ट अहवाल दिलेला असतानाही सामान्य प्रशासन विभागात ही फाईल चौकशीविना पडून आहे. कंत्राटी नियुक्तीनंतर मनपाचे जावई म्हणून ठिय्या मारलेल्या अनेकांना आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी घरचा रस्ता दाखविण्यास सुरुवात केली आहे. लाड कमिटीचा फायदा घेत मनपा कर्मचाºयांच्या संगनमताने कायम नोकरीवर घुसलेल्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया कर्मचाºयांमधून व्यक्त होत आहे.