पोथरे येथील बंधाऱ्याचे काम अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:07+5:302021-05-26T04:23:07+5:30
पोथरे, तालुका करमाळा येथे कान्होळा नदीवर युती सरकारच्या काळात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प योजनेतून सहा बंधारे मंजूर झाले आहेत. यातील ...
पोथरे, तालुका करमाळा येथे कान्होळा नदीवर युती सरकारच्या काळात नदी पुनरुज्जीवन प्रकल्प योजनेतून सहा बंधारे मंजूर झाले आहेत. यातील एका बंधाऱ्याचे काम विलास शिंदे यांच्या शेताशेजारी गेल्या महिन्यात सुरू झाले. मात्र गेले पंधरा दिवस झाले हे काम बंद असून संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडून येथील सर्व साहित्य नेले आहे.
सहा जूनपासून पावसाळा सुरू होत असल्याने हे काम होणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. सध्या हे काम अर्धवट स्थितीत असून झालेल्या कामातही ठिकठिकाणी खड्डे (भुगीर) असून या ठिकाणी वाळू-सिमेंटऐवजी गोणी, पोती बसूवन खड्डे बुजवले आहेत. याशिवाय बंधाऱ्यातील खोदाई फक्त दोन्ही बाजूच्या भरावालगत करण्यात आली असून मधली माती तशीच आहे. त्यामुळे यात शून्य टक्के पाणी साठणार आहे.
लाखो रुपये खर्च करूनही बंधाऱ्यात पाणी साठत नसेल, तर याचा फायदा काय? त्यामुळे संबंधित अधिकारी, ठेकेदार यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तातडीने काम सुरू करून काम पूर्णत्वास न्यावे, अशी येथील शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.
---
बंधाऱ्याचे राहिलेले बांधकाम पूर्ण होऊन मधील खोदाई होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून काम सुरू करावे.
- मंगेश शिंदे, शेतकरी, पोथरे.
फोटो ओळी
बंधाऱ्याच्या मुख्य भिंतीत बसवलेली पोती. दुसर्या छायाचित्रात अर्धवट राहिलेले बांधकाम.
----