चिलारीच्या झुडपात सुरू होते हातभट्टीची दारू काढण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:23 AM2021-05-06T04:23:33+5:302021-05-06T04:23:33+5:30
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने पोलीस देगाव (ता. पंढरपूर) पेट्रोलिंग करत होते. ...
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने पोलीस देगाव (ता. पंढरपूर) पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना बिभीषण शामराव पवार व नामदेव अशोक काळे हे दोघेजण ओढ्याचे कडेला चिलारीच्या झुडपात हातभट्टीची दारू गाळून त्याची चोरटी विक्री करत आहेत, अशी माहिती मिळाली. पोलीस जीपमधून पारधी वस्तीजवळ असलेल्या ओढ्याच्या कडेवर आले तेथे जीप थांबवून चालत जात होते. या दरम्यान त्यांना चिलारीच्या झुडपात बिभीषण शामराव पवार व नामदेव अशोक काळे हे दोघेजण दोन लोखंडी पत्र्याच्या बॅरलमध्ये रसायन भरून ते बॅरल दगडी व मातीने बनविल्या भट्टीवर ठेवून भट्टीत जाळ घालत बसलेले व सदर बॅरलमध्ये असलेले उग्र व घाण वासाचे रसायन काठीच्या सहाय्याने ढवळत असल्याचे दिसून आले.
पोलिसांना पाहून ते दोघे चिलारीच्या झुडपातून पळून गेले. तेथे गूळमिश्रीत रसायन, तयार हातभट्टी दारू व हातभट्टी रसायन तयार करण्याचे साहित्य असा २२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी बिभीषण शामराव पवार व नामदेव अशोक काळे (रा. देगाव, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ), (ई) व भादंवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याचे पो नि. किरण अवचर यांनी सांगितले.