माझ्या स्पीडने काम करा...अन्यथा...
By admin | Published: June 13, 2014 12:46 AM2014-06-13T00:46:00+5:302014-06-13T00:46:00+5:30
जि.प. खातेप्रमुखांची बैठक; चंद्रकांत गुडेवार यांनी भरला दम
सोलापूर : माझ्या स्पीडने काम करा, भ्रष्टाचार चालणार नाही, दप्तर दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई केली जाईल, फिल्डवर जाऊन तपासण्या करा अशा सूचना दिल्या आहेत जि.प.चे सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी.
सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार घेतल्यानंतर रात्री ९ वाजता त्यांनी खातेप्रमुखांची बैठक घेतली. ही बैठक रात्री साडेदहा वाजेपर्यंत चालली. प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी प्रभू जाधव वगळता अन्य सर्वच खातेप्रमुख या बैठकीला होते. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहीतच आहे. कामाचे स्पीड माझ्या कामाप्रमाणे ठेवा, दप्तर दिरंगाई केली तर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई केली जाईल असे गुडेवार म्हणाले. एक-दोन वेतनवाढ ही कारवाई नाही तर गंभीर स्वरुपाची कारवाई माझ्याकडून होईल असे काम करु नका असेही त्यांची सांगितले.
गैरप्रकार करु नका, पैशासाठी फाईल थांबल्याचे निदर्शनाला आले तर जागेवरच कारवाई केली जाईल, प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाईल असा इशारा त्यांनी दिला. खात्याच्या खालपासून खातेप्रमुखापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर गावकऱ्यांना माहीत असले पाहिजेत. मुख्यालयात ज्या दिवशी असाल त्यादिवशी फाईल झटपट निकाली काढा. केवळ कार्यालयात न थांबता फिल्डवर तपासण्या करा, असे त्यांनी सांगितले.
--------------------
आत काम करावे लागणार
अनेक खातेप्रमुख मुख्यालय सोडत नाहीत. फिरत्याही करीत नाहीत. कार्यालयात बसून फायलीही काढत नाहीत. गुडेवार यांनी कामाचा वेग वाढवा अन्यथा सोडणार नाही, असा दम भरल्याने अधिकाऱ्यांना कामाला लागावे लागणार आहे. शाळा, दवाखाने आता सुरू ठेवावे लागणार आहे. मुख्यालयातील ओस कार्यालये आता भरलेली दिसतील.