सोलापूर जिल्हा परिषदेत २० कोटी रूपयाच्या कामांना लवकरच सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:00 PM2017-10-25T16:00:10+5:302017-10-25T16:03:19+5:30
जीएसटीचा तिढा आणि शासकीय दरसूचीबाबत मार्गदर्शन न मिळाल्याने जिल्हा परिषदेकडील कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. ही कामे आता मार्गी लागली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : जीएसटीचा तिढा आणि शासकीय दरसूचीबाबत मार्गदर्शन न मिळाल्याने जिल्हा परिषदेकडील कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. ही कामे आता मार्गी लागली असून, आठवडाभरात २० कोटींहून अधिक रुपयांच्या रस्ते विकासकामांच्या ई निविदा जारी होत आहेत. उर्वरित विभागांमार्फत करण्यात येणाºया कामांच्याही निविदा लवकरच जारी होत आहेत. एकूणच जिल्हा परिषदेत आगामी दिवसांत विकासकामांचा धडाका लागणार आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला विकास निधी देण्यात येतो. यंदाच्या वर्षी कर्जमाफीमुळे या निधीत मोठी कपात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग १ मार्फत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, अक्कलकोट या तालुक्यांसाठी शासनाच्या ३०५४ योजनेतून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कर्जमाफीमुळे यातील २.४० कोटी निधी कपात करण्यात आला. उर्वरित ५ कोटी ६० लाख रुपयांत मागील वर्षीचे ३ कोटी ६६ लाख रुपयांची देणी द्यावी लागतील. चालू वर्षासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. या निधीच्या दीडपट मान्यता घेऊन जवळपास २ कोटी ९५ लाख रुपयांची कामे निश्चित करण्यात आली आहेत. याची निविदा जारी होत आहे. बांधकाम विभाग २ च्या माध्यमातून मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा या तालुक्यांसाठी ३०५४ योजनेतून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र यातील ३० टक्के म्हणजेच २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी कर्जमाफीमुळे कमी करण्यात आला. ५ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून ४ कोटी २ लाख रुपयांचे मागील देणे आहे. १ कोटी ५३ लाख निधी शिल्लक आहे. यातून दीडपट कामाची मान्यता घेऊन २ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामाच्या ई निविदा लवकरच जारी होत आहेत.