पंढरपुरातील गंगेकर गँगच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:17 AM2021-06-02T04:17:55+5:302021-06-02T04:17:55+5:30
दोन महिन्यांपूर्वी अण्णा दांडगे व सुरज ऊर्फ लल्या गंगेकर यांच्यात जुनी पेठ भागात भांडण झाले होते. तेव्हा अण्णा दांडगे ...
दोन महिन्यांपूर्वी अण्णा दांडगे व सुरज ऊर्फ लल्या गंगेकर यांच्यात जुनी पेठ भागात भांडण झाले होते. तेव्हा अण्णा दांडगे याने पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर अण्णा दांडगे याने सुरज ऊर्फ लल्या गंगेकर याच्यापासून जीवितास धोका असल्याबाबत पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी अर्ज दिले होते. याचा राग मनात धरून रविवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अण्णा दांडगे याच्या डोक्यात निखिल गंगेकर याने कोयत्याने हल्ला केला. तेव्हा सुरज ऊर्फ लल्या याने त्याच्याजवळील कोयत्याच्या उलट्या बाजूने अण्णाच्या पायावर मारले. याप्रकरणी गंगेकरसह इतर ९ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदला होता.
त्याचबरोबर अनिलनगर परिसरातील सरकारी जागा गंगेकरने अनेकांना विकल्या आहेत. बऱ्याच लोकांना राहत्या जागेवरून हाकलून देऊन त्या जागा दुसऱ्या लोकांना विकल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. शिवाय महादेवी रामचंद्र वैरागकर (४०, रा. डोंबे गल्ली, पंढरपूर) यांनी अक्षय प्रताप गंगेकर यास स्कूटी विकली होती. त्याचे बँकेचे हप्ते न भरल्याने घर खाली कर नाही तर तुझा मुलगा बबलू यास ठार मारतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. यामुळे महादेवी वैरागकर यांनी नागेश गंगेकर, प्रताप गंगेकर, अक्षय गंगेकर (सर्व रा. अनिलनगर, पंढरपूर) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात २४ मे रोजी गुन्हा नोंदवला आहे. यामुळे पोलिसांनी गंगेकर गँगची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
----
तक्रार असल्यास संपर्क साधा
निखिल गंगेकर याच्याविरुद्ध ४ गुन्हे, सुरज ऊर्फ लल्या गंगेकर यांच्याविरुद्ध ३ गुन्हे, विवेक नागेश गंगेकर याच्या विरुध्द ३ गुन्हे दाखल आहेत. गंगेकर यांनी इतर कोणाला त्रास दिला असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.
---