डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; मंगळवेढा रोडवरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:07 PM2019-12-31T14:07:51+5:302019-12-31T14:10:38+5:30
शासकीय रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी; प्रेत ताब्यात घेण्यास दिला नकार
सोलापूर : मंगळवेढा रोडवरील हिरज फाट्याजवळील पेट्रोलपंपाजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाजवळ डंपरखाली सापडून मजुराचा मृत्यु झाला. हा अपघात सोमवारी रात्री ११ वाजता घडला. चालकाच्या हलगर्जीपणामुळे मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी शासकीय रूग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
कुमार मसाजी रासेराव (वय २१ रा. शिंगोली ता. मोहोळ) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. कुमार रासेवार याचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले आहे, बेरोजगार असल्याने तो मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला जात होता. सोमवारी रात्री ७ वाजता तो घरी आई व बहिणींसोबत जेवण केला. रात्री ८ ची ड्युटी असल्याने तो घरातून सातच्या सुमारास बाहेर पडला. आठ वाजता कामावर जाऊन कामाला सुरूवात केली. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर खडी टाकण्यासाठी डंपर ट्रक (क्र. एम पी-३९ एच-0९८४) आला. खडी टाकण्यासाठी त्याने मजुर कुमार रासेराव याला पाठीमागचा फाळका काढण्यास सांगितले.
कुमार रासेराव याने पाठीमागे जाऊन फाळका काढला, त्यानंतर खडी पुर्ण रस्त्यावर टाकण्यात आली. खडी टाकल्यानंतर डंपर ट्रक पुढे गेला, मात्र त्याचे चाक खड्ड्यामध्ये रूतले. चालकाने तो डंपर पाठीमागे पुढे करीत असताना मागील चाक कुमार रासेराव याच्या अंगावरून गेले, त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र हा प्रकार चालकाच्या लक्षात आला नाही, तो पुढे तसाच निघुन गेला. रात्री १ वाजता कुमार रासेराव हा मृत अवस्थेत पडल्याचे तेथे काम करणाºया अन्य कर्मचाºयांच्या लक्षात आले. कर्मचाºयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून पहाटे तीनच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. याची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.