चिमणी पाडकामाला विरोध करण्यासाठी सिद्धेश्वर कारखाना स्थळावर एकवटले कामगार
By राकेश कदम | Published: June 12, 2023 05:26 PM2023-06-12T17:26:54+5:302023-06-12T17:30:06+5:30
महापालिकेने कारवाई केल्यास तीव्र विरोध करू, असे कामगार युनियनच्या नेत्यांनी सांगितले.
महापालिका लवकरच (कुमठे या. उत्तर सोलापूर) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडकामाची कारवाई सुरू करणार आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी कारखान्याचे कामगार सोमवारी एकवटले. महापालिकेने कारवाई केल्यास तीव्र विरोध करू, असे कामगार युनियनच्या नेत्यांनी सांगितले.
होटगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत असल्याचे डीजीसीएचे म्हणणे आहे. महापालिकेने चिमणी पाडण्याचे आदेश कारखान्याला दिले आहे. महापालिकेच्या या निर्णयाविरोधात कारखान्याचे कामगार गेल्या १९९ दिवसांपासून कारखाना स्थळावर चक्री उपोषण करीत आहेत. या दरम्यानच महापालिकेने 16 जून पासून कारखान्याच्या चिमणी पाडकामाची कारवाई सुरू होईल असे संकेत दिले होते.
कारखाना स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी कारखान्याचे शेकडो कामगार कारखाना स्थळावर दाखल झाले. महापालिका आणि पोलिसांनी कारवाई सुरू केल्यास कामगार तीव्र विरोध करतील असा इशारा कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार यांनी दिला.