इथल्या कष्टकरी, श्रमिकांना जगण्यासाठी उभारी हवीय...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:45 PM2020-06-03T12:45:33+5:302020-06-03T12:46:50+5:30
दोन महिन्यांहून अधिक काळ लादलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. त्यामुळे टाळेबंदीचा परतीचा प्रवास सुरू झाला.
दोन महिन्यांहून अधिक काळ लादलेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने मागे घेतली जाईल. त्यामुळे टाळेबंदीचा परतीचा प्रवास सुरू झाला, असे म्हणायला हरकत नाही. जनजीवन पूर्वपदावर येणार असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत आपली दिनचर्या सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले. परंतु या टप्पयावर शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल झाला, तो म्हणजे अगदी सुरुवातीला देशभर टाळेबंदी सुरू करताना प्रधानमंत्र्यांनी कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याची भूमिका घेतली होती. त्यात बदल करून आता कोरोनाशी युद्ध नव्हे तर कोरोनासह जगायला शिकू या, अशी भूमिका आहे.
महाराष्ट्र राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी नुकतेच लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या मते महाराष्ट्रात कोरोना प्रसाराचा वेग राज्यात कमी झाला आहे. एका माणसाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तो इतर किती जणांना संसर्ग करू शकतो, याला ‘संसर्गदर’ म्हणतात. तो आपल्याकडे मार्च महिन्यामध्ये ४ च्या आसपास होता तर आता आपल्या सर्वांगीण प्रयत्नामुळे १.२३ पर्यंत खाली आला आहे. तो आणखीन खाली येण्यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे आहे.
एकीकडे शासकीय अधिकारी भलावण करतात तर दुसरीकडे सोलापुरातील कष्टकºयांनी व्यापलेल्या भागातील चित्र चिंता करायला लावतेय. बाधितांची संख्या, मृतांची संख्या, रुग्णसेवेची कमतरता गरीब रुग्णांची हेळसांड आणि खासगी डॉक्टरांचा नकार, अशा अनेक गोष्टींमुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांची बदली झाली. राज्य शासन आणि प्रशासन सोलापूरविषयी उशिरा का होईना जागे झाले हेही नसे थोडके. इथले कारखानदार आणि कष्टकरीवर्ग खूपच भयभीत आणि भविष्याविषयी चिंतित आहेत. टाळेबंदी उठून जनजीवन सुरू झाले तरीही मोकळेपणाने सहभाग देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. सगळेच अस्वस्थ आहेत. कारण टाळेबंदीच्या काळातील श्रमिकांचा अनुभव खूपच जीवघेणा होता, दुर्दैवाने अजूनही आहे. हातावर पोट असणाºयांना उपाशीपोटी राहावे लागले. त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाही.. म्हणून स्वत:च्या डोळ्यांदेखत बायको, मुलांना तडफडताना पाहिलेल्या मजुरांची जगण्याची उमेद खचली, तर कारखानदार या महामारीने हादरून गेले आहेत. कारखाने चालू करण्याच्या मानसिकतेत नाहीत.
खरेतर कोरोना विषाणूने इथल्या समाजजीवनामध्ये विष कालवले असेच म्हणावे लागेल. आजपर्यंत ज्यांच्यासोबत एकत्रित राहिलो त्यांच्याशी दूर राहावे लागतेय. श्रीमंत लोकांचा कष्टकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तसं पाहिलं तर ‘सोशल डिस्टन्स’मुळे समाजातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवहारालाच मर्यादा आल्या. समाज दुभंगला. देवळे, मशिदी, चर्च बंद. शाळा-महाविद्यालये बंद. सण, उत्सव, परंपरा साजरा करता येत नाहीत. त्यामुळे लोकांनी जन्मल्यापासून पोसलेली सांस्कृतिक मानसिकता घायाळ झाली. लग्न, वाढदिवस. जयंत्या, पुण्यतिथ्या अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली. शतकानुशतकांची परंपरा असणारी पंढरीची वारी यंदा पायी जाणार नाही. ही गोष्टच लाखो वारकºयांना भावनिक आणि मानसिकदृष्ट्या मान्य न होणारी आहे. हॉटेल्स, मॉल्स, सिनेमा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, नृत्य, गाणी आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांवर बंदी आल्यामुळे लोकांच्या भावना आणि मनं थिजली. पूर्वीप्रमाणे आप्तेष्टांच्या भेटीगाठी थांबल्यामुळे व्यक्त होणं थांबलं. गप्पा बंद झाल्या. मोकळं होणंच थांबल्यामुळे सगळेच अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थताच कष्टकºयांच्या अनारोग्याला कारणीभूत ठरते. आर्थिक परिस्थिती बदलल्याशिवाय आरोग्य सुधारणे शक्य नाही.
नाशिकच्या मालेगावमधील यंत्रमाग कारखाने चालू झाले, तर मग सोलापुरातील कारखाने बंद का? केंद्रीय मंत्रिमंडळाने आत्मनिर्भर भारत घोषित करून लघु आणि मध्यम उद्योग सक्षम करण्याची योजना जाहीर केली, त्याचा फायदा घेत सोलापुरातील चादर कारखाने सुरू व्हायला हवेत. त्यातून कारखानदारांचे पुनर्वसन आणि कामगारांना रोजगार मिळेल. पोटभर जेवण आणि अंगभर काम मिळाले की, आरोग्य आपोआप सुधारेल. हे सारं व्यक्त होण्याचा मथितार्थ एकच आहे. इथल्या कष्टकरी, श्रमिकांना जगण्यासाठी उभारी हवीय.. एवढेच...!
- प्रा. विलास बेत
(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.)