सोन्यासारखा संसार क्षणात पोरका झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:21 AM2021-04-24T04:21:39+5:302021-04-24T04:21:39+5:30
‘चिमणी पाखरं’ या सिनेमामधील होता सोन्याचा संसार, राजा-राणीचा दरबार या गीतातील ओळीप्रमाणेच घटना इंचगाव ता.मोहोळ येथे घडली. झाले असे ...
‘चिमणी पाखरं’ या सिनेमामधील होता सोन्याचा संसार, राजा-राणीचा दरबार या गीतातील ओळीप्रमाणेच घटना इंचगाव ता.मोहोळ येथे घडली. झाले असे की, राजा-राणीच्या संसारातील राणी क्षणात सोडून गेली आणि पती व तीन मुले असणारा गोड संसार पोरका झाला.
ही कहाणी इंचगाव ता.मोहोळ येथील अल्पभूधारक शेतकरी दत्तात्रय वराडे यांची आहे. १८ रोजी सकाळी ९ वाजता हरभऱ्याची रास करण्यासाठी दत्तात्रय वराडे हे स्वत: पत्नी सरस्वती, मुलगी निकिता, नेहा व मुलगा शुक्राचार्य असे पाच जण शेतात गेले होते.
हे सर्व कुटुंब मळणी यंत्राद्वारे हरभऱ्याची ते रास करत होते. अडीच एकर शेतात गहू व हरभरा अशी दुहेरी पिके घेण्यात आली होती. सुरुवातीला गव्हाची रास केली. नंतर हरभऱ्याची रास सुरू झाली. केवळ १५ मिनिटांत ही रास संपणार होती. या घाई-गडबडीत मळणी यंत्रात सरस्वती यांचा डोक्याला बांधलेला स्कार्फ अडकला.
स्कार्फ कसा अडकला आणि कधी अडकला, हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. फक्त ‘अगं आई’ असा आवाज बाहेर आला अन् बघता-बघता क्षणार्धात तिचे मुंडके धडावेगळे झाले.
केविलवाणी चेहरा करून मुलांनी फोडला हंबरडा
एका डोळ्यांनी अंध असणारे दत्तात्रय हे पत्नीला वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. मळणी यंत्र कसे बंद करायचे, हेही त्यांना कळत नव्हते, परंतु तोपर्यंत नियतीने डाव साधला होता. शरीर हे तडफडत-तडफडत शांत झालं होत.
मळणी यंत्राच्या पुढे पत्नीचे मुंडके व पाठीमागे शरीर पडले होते. पतीने व मुलांनी हंबरडा फोडला. मुलांना सोडून एका माउलीने या जगाचा निरोप घेतला. कारभारणीने संसार अर्धवट सोडून गेल्याने पती हतबल झाले.
तीन मुले केविलवाणा चेहरा करून आईकडे पाहून रडत होती. आता आपलं कसं व्हायचं, या चिंतेत पती अन् मुलं चिंतातुर दिसत होती. सासर व माहेर दोन्ही इंचगाव हे गावच असल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
फोटो
२३कामती०१
ओळी
इंचगाव येथील सरस्वती वराडे यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर केविलवाणा चेहरा करून दु:खात असलेले मुले व पती.