गुलाबशेतीनं फुलवला घोरपडे दांपत्याचा संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:03 PM2020-02-15T12:03:10+5:302020-02-15T12:08:07+5:30
कव्हेतील शेतकºयाचा यशस्वी प्रयोग; सेंद्रिय खतावर अन् अंतर्गत मशागतीवर ३० गुंठ्यात घेतले फूल पीक
प्रसाद पाटील
पानगाव : गुलाबाचं फूल म्हणजे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं... पण या गुलाब शेतीनं मात्र एकाचा प्रपंच फुलवलाय... रोजच्या काही हजारात येणाºया आर्थिक उत्पन्नामुळे कव्हे (ता. बार्शी) येथील त्या कुटुंबाने आर्थिक प्रगती साधली आहे. सेंद्रिय खते आणि किरकोळ फवारण्या करून त्यांनी हे पीक साधले आहे.
शेतकरी सुभाष अर्जुन घोरपडे असे त्या शेतकºयाचे नाव आहे़ त्यांची एकूण अडीच एकर जमीन आहे. बागायतीत त्यांनी भावासोबत एक मोठे शेततळे साकारून पाण्याचे व्यवस्थापन केले. या अडीच एकरापैकी ३० गुंठे (पाऊण एकर) क्षेत्रावर ते गेल्या २० वर्षांपासून गुलाब शेती करताहेत़ खरीप हंगामात ३० गुंठे क्षेत्रावर शेवंतीच्या फुलांची लागवड केली आहे. पाऊण एकर गुलाबापासून दररोज सरासरी एक हजार रुपये तर शेवंती फुलापासून आॅक्टोबर ते मार्च या पाच महिन्यात सरासरी दोन हजार रुपये मिळताहेत़
गुलाबाच्या १० फुलांच्या एका पेंढीला १० ते २५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. दररोज २०० पेंढ्यांची बाजारात विक्री होते़ यापासून या कुटुंबाला सकाळी दोन तासांच्या श्रमात वर्षाकाठी तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळते आहे़ घरातील व्यक्ती आणि मजुरांकरवी दररोज एक क्विंटल फुले बाजारात जातात. शेवंतीला दर ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत मिळाला आहे. शेवंतीपासून घोरपडे यांना पाच महिन्यांत ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ फुलावर फवारणीसाठी त्यांना वार्षिक ४० हजार रुपये तर शेवंतीच्या रोग व कीड नियंत्रणासाठी ६० हजार खर्च झाला आहे. या कुटुंबाला वार्षिक निव्वळ नफा ५ लाख रुपये झाला आहे.
गुलाबावर ढगाळ वातावरणात भुरी, करपा, मावा यांचा प्रादुर्भाव होतो़ अशावेळी तो रोखण्यासाठी २२:३ आणि रोगर यांच्या फवारण्या केल्या आहेत. १५ मिनिटात ३० गुंठ्यांवर फवारणी झाली़ शेवंतीवर बोंडअळी जडते़ त्यावर बायोरीनची फवारणी केली़ ही फवारणी एकदाच केली जाते़ लागवड केलेली गुलाबाची बाग ही १० ते १५ वर्षे चालते़ कृषी सहायक सुधीर काशीद यांचे मार्गदर्शन लाभत आहे़
कव्हेत फ्लॉवर हब बनवण्याची धडपड
- भविष्यात कव्हेत फ्लॉवर हब बनवण्याची धडपड कृ षी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे़ येथील ३० शेतकरी हे एकत्रित येऊन सामूहिक गुलाब शेती करण्याचा प्रयोग सुरू आहे़ कृ षी सहायक हे येथेच आढावा घेतात़ तसेच शेवंतीसाठीही जवळचे ३० शेतकºयांची सामूहिक शेती करत आहेत़ याशिवाय गलांडा फुलासाठी कोरफळेतून ३० शेतकºयांनी सामूहिक शेतीसाठी तयारी चालवली आहे़
६ बाय ६ वर गुलाब रोपे लावली़ तण उगवल्यानंतर कोळप्याने अंतर्गत मशागत केली़ पावसाळ्यात ३-४ वेळा मशागत केली़ सेंद्रिय खतावर ही संपूर्ण बाग फुलवली आहे़ या कामात पत्नी प्रभावती व मुलगा संकेत यांची साथ लाभली आहे.
- सुभाष घोरपडे
फूल उत्पादक