व्वा खूपच छान; आता आजी-आजोबा खेळणार कॅरम, बुद्धिबळ अन् लुडो गेम !
By Appasaheb.patil | Published: July 1, 2023 07:15 PM2023-07-01T19:15:20+5:302023-07-01T19:16:25+5:30
विणकर बागेत विरंगुळा केंद्र; महापालिका देखभाल, दुरूस्ती करणार
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सकाळ व संध्याकाळी वॉकिंगसाठी आलेल्या ज्येष्ठांचा वेळ जावा. एकमेकांशी गप्पा-गोष्टी कराव्यात यासाठी महापालिकेने विणकर बागेत विरंगुळा केंद्र सुरू केले आहे. या विरंगुळा केंद्रात आता शहरातील आजी-आजोबा कॅरम, बुध्दीबळ, लुडो गेमसह अन्य मिरवणूकीच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने तेथे जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, विविध बैठे खेळ तसेच इनडोअर खेळ आणि अन्य करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळविले हाेते. त्यानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विणकर बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले. याचे उद्घाटन आ. विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक शहद मैंदर्गी, सिद्धाराम कोंडे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपअभियंता किशोर सातपुते, झाकीर हुसेन नाईकवाडी किशोर तळीकडे ,गणेश गुज्जा,श्री भूतडा, माजी नगरसेवक अमर पुदाले, माजी नगरसेविका सोनाली मूटकरी, जिलानी सगरी, सतीश महाले, आनंद बिरू आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर शहरातील विणकर बागेत या ठिकाणी जेष्ठ नागरिक हे सकाळी व सायंकाळी वॉकिंग साठी येत असतात. त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना व्हावा म्हणून या ज्येष्ठ नागरिक केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचण्यासंदर्भात वर्तमानपत्र, कॅरम, बुद्धिबळ, लुडो गेम विविध बैठक खेळ, इनडोर खेळ अन्य करमणुकीचे सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. हे केंद्र सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.