दररोज इंग्रजीचे दहा शब्द लिहून काढा : येळीकर
By Admin | Published: June 8, 2014 01:02 AM2014-06-08T01:02:21+5:302014-06-08T01:02:21+5:30
सोलापूर : सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे.
सोलापूर : सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीच नव्हे तर इतर भाषाही अवगत झाल्या पाहिजेत. इंग्रजीविषयी न्यूनगंड बाळगू नका. दररोज इंग्रजीचे १० शब्द लिहून काढा. इंग्रजी दैनिके वाचा, चॅनल्स पाहा. पुढे त्याची उजळणी करा, म्हणजे इंग्रजीवर तुम्हीच प्रेम कराल, असा कानमंत्र डी. एच.बी. सोनी महाविद्यालयाचे संचालक डॉ. राजशेखर येळीकर यांनी दिला.
लोकमत अॅस्पायर आणि डी.एच. बी. सोनी कॉलेजच्या एज्युकेशन फेअरनिमित्त शनिवारी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘ध्येय निश्चिती व यश’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
डॉ. येळीकर म्हणाले, आधी ध्येय निश्चित करा. हे करीत असताना किमान १५ वर्षांपर्यंत आपले करिअर कसे वाढत जाईल, यावर भर द्या. ध्येयनिश्चिती बद्दल बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयावर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्या दौऱ्याची आखणी, केलेले नियोजन आणि ठेवलेल्या नियंत्रणावरच त्यांना प्रचंड यश मिळाले.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पंचसूत्र अवलंबणे गरजेचे आहे. अॅटीट्यूट, लीडरशिप, कम्युनिकेशन, पर्सनल डेव्हलपमेंट आणि टाइम मॅनेजमेंट हे पंचसूत्र आत्मसात केले पाहिजे. नेतृत्वगुण सांगताना त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आलेखच त्यांनी मांडला. आज आपण दिवसभर कसे वागलो. त्यात काही बदल करता येईल का? जो अपडेट राहतो तो पुढे जातो. एकूणच त्यांनी आपल्या व्याख्यानात यशाचा कानमंत्र दिला.