श्रीक्षेत्र मार्डीच्या यमाईदेवी नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; जाणून घ्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती

By Appasaheb.patil | Published: September 25, 2022 03:14 PM2022-09-25T15:14:25+5:302022-09-25T15:14:31+5:30

 श्रीदेवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणूनही मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो.

Yamaidevi Navratri festival of Srikshetra Mardi starts from tomorrow; Learn about the religious program | श्रीक्षेत्र मार्डीच्या यमाईदेवी नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; जाणून घ्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती

श्रीक्षेत्र मार्डीच्या यमाईदेवी नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ; जाणून घ्या धार्मिक कार्यक्रमाची माहिती

googlenewsNext

सोलापूर  :  `महाक्षेत्र मारुडी आदिस्थान । महाकालची शक्ती नांदे निदान । तुझ्या दर्शनी मुक्ती होय सर्व लोका । यमाई यमाई असे नित्य घोका ।` महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मोठी बहीण असलेल्या व एक हजार वर्षांची परंपरा असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाईदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पासून प्रारंभ होत आहे. 

 श्रीदेवी सप्तशती या ग्रंथाचे रचनाकार महान शिवभक्त श्री मार्कंडेय ऋषी यांची तपोभूमी म्हणूनही मार्कंडेय पुराणात मारोडी या गावाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे मार्डी या तीर्थक्षेत्राला प्रतिकाशी म्हणून वारसा लाभला आहे. देवी भागवत ग्रंथामध्येही या गावाचा उल्लेख आढळतो. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर मार्डीच्या यमाईदेवीचे दर्शन घेण्याची परंपरा भाविक पाळतात. तर विवाहानंतर नवदांपत्य वाहूर यात्रेसाठी तुळजापूर नंतर श्रीक्षेत्र मार्डी येथे दर्शनासाठी येतात, हे देखील या स्थानाचे महात्म्य आहे. सोमवार २६ रोजी सकाळी नऊ वाजता देवीची महापूजा व घटस्थापना करण्यात येणार आहे.

दररोज पहाटे साडेचार वाजता महापूजा, सकाळी नऊ वाजता नित्यपूजा आणि रात्री आठ वाजता शेजारती हे नवरात्रोत्सवकाळातील दिनक्रम आहे. शुक्रवार दि. 30 रोजी ललिता पंचमी असून सोमवार ३ आक्टोबर रोजी रोजी सकाळी अकरा वाजता आद्य देवीभक्त रंगनाथ स्वामी मोकाशी यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात नवचंडी होम होईल. मंगळवार ४ रोजी रात्री दहा वाजता देवीच्या मंदिरात नवचंडी होम होणार आहे. रात्री एक वाजता अजाबली होईल. बुधवार ५ आक्टोबर रोजी विजयादशमी दिवशी सायंकाळी सात वाजता सिमोलंघनानिमित्त देवीची पालखी मिरवणूक निघणार आहे.

नवरात्रोत्सव काळात भाविकांनी शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, उपसरपंच काशीनाथ कदम, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, ज्येष्ठ नेते विठ्ठल काशीद, शहाजी पवार, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवाजी गुरव, विश्वस्त रंगनाथ गुरव, दत्तात्रय गुरव, पुजारी अशोक गुरव, विकास गुरव, पंकज गुरव यांनी केले आहे.   

Web Title: Yamaidevi Navratri festival of Srikshetra Mardi starts from tomorrow; Learn about the religious program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.